मुलाला भेटू न देणाऱ्या पत्नीची चेंबूर परिसरात सोमवारी रात्री भर रस्त्यात चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. जारा शेख (२०) असे हत्या करण्यात आलेल्या पत्नीचे नाव असून इकबाल शेख (३६) शेख असे आरोपी पतीचे नाव आहे.

हेही वाचा- रानडुकराच्या हल्ल्यात दुचाकीस्वार ठार; मृत व्यक्तीच्या बायकोला १० लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश

चेंबूरमधील पी. एल. लोखंडे मार्गावर वास्तव्यास असोल्या जारा शेख (२०) हिचा तीन वर्षांपूर्वी इकबाल शेख (३६) याच्याबरोबर विवाह झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून जारा आणि इकबालमध्ये खटके उडू लागले होते. उभयतांमधील वाद विकोपाला गेल्यामुळे काही दिवस जारा महिला वसतिगृहात राहात होती. काही दिवसांपूर्वीच ती पुन्हा चेंबूर परिसरात वास्तव्यास आली होती. या दोघांना दोन वर्षांचा मुलगा आहे. मुलाचा ताबा मिळावा यासाठी इकबाल तिला धमकावत होता. यासाठी त्याने अनेक वेळा जाराला मारहाणही केली होती, असा आरोप जाराच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा- दाऊदचा विश्वासू सहकारी रियाझ भाटीला अटक; खंडणीप्रकरणी गुन्हे शाखेची कारवाई

चेंबूर परिसरात ती सोमवारी रात्री फिरत होती. त्याच वेळी इकबालने तिला गाठले आणि तिच्यावर चाकूने वार केले. तिला तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. टिळक नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून इकबालला अटक केली.

लव्ह जिहादमधून हत्या झाल्याचा आरोप

जारा पूर्वाश्रमीची रुपाली चंदनशिवे होती. विवाहानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिच्याशी सर्व संबंध तोडून टाकले होते. बुरखा घालावा, तसेच मुस्लिम रितीरिवाज पाळण्याबाबत इकबाल आणि त्याचे नातेवाईक तिला नेहमी मारहाण करीत होते. त्यामुळे तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता, असा आरोप जाराची आई आणि बहिणीने केला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास करून पतीला फाशी द्यावी अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे.

हेही वाचा- पीएफआय प्रकरण : पाच जणांना ३ ऑक्टोबपर्यंत एटीएस कोठडी

प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग न देण्याचे पोलिसांचे आवाहन

या प्रकरणी केलेल्या तपासात लव्ह जिहादचा कोणताही प्रकार घडलेला दिसत नाही. आरोपी आणि त्याची पत्नी यांच्यामध्ये मुस्लीम धर्माच्या रितीरिवाजावरून कोणताही वाद नव्हता. त्यामुळे या प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग देऊ नये, तसेच अफवा पसरवून सामाजिक तणावर निर्माण करू नये, असे आवाहन टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील काळे यांनी केले आहे.