मुंबई : वडाळा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १८१ च्या उमेदवार पुष्पा कोळी यांच्या पतीचे मतदानाच्या दिवशी गुरुवारी सकाळी निधन झाले. शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवार पुष्पा कोळी यांचे पती कृष्णा कोळी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सकाळी निधन झाले.
वडाळा विधानसभा मतदारसंघात १८१ मध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाकडून उमेदवार पुष्पा कोळी या निवडणूक लढवत आहेत. कोळी या याच प्रभागातील माजी नगरसेविका आहेत. मतदानाच्या दिवशीच त्यांच्या पतीचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे त्यांच्या प्रभागात, कार्यकर्त्यांमध्ये दुःखाची लाट पसरली.
कृष्णा कोळी यांच्या निधनाचे वृत्त समजताच माजी खासदार राहुल शेवाळे, भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री शिरवडकर, भाजपचे राजेश शिरवडकर, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोळी यांच्या घरी जाऊन अंत्यदर्शन घेतले. पुष्पा कोळी यांनी काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसमधून शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला होता. यंदा त्यांचा प्रभाग सर्वसाधारण खुला झाला आहे. मात्र कोळी यांचा या प्रभागात चांगला जनसंपर्क असल्यामुळे पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र मतदानाच्या दिवशीच त्यांच्या पतीचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
