मुंबईतील बोरिवली परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका जोडप्यात बेडवर झोपण्यावरून वाद झाला आहे. या वादातून पतीने मारहाणीत पत्नीच्या कानाला अंतर्गत दुखापत झाली आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पीडित महिलेनं २०२२ मध्ये पतीशी घटस्फोट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पतीने घटस्फोट देण्यास नकार दिला. तेव्हापासून या जोडप्याच्या नात्यात दरी निर्माण झाली होती. दरम्यान, या जोडप्यात सतत वादाचे खटके उडत होते.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित जोडप्याने घरातील बेडवर आळीपाळीने झोपण्याचा निर्णय घेतला होता. घटनेच्या दिवशी शनिवारी बेडवर झोपण्याची पाळी बायकोची होती. ठरवल्याप्रमाणे पीडित महिला बेडवर झोपली होती. पण पहाटे एक वाजण्याच्या सुमारास
पतीने ‘मला बेडवर आराम करायचा आहे’, असं पत्नीला सांगितलं. पण ‘आज बेडवर झोपण्याची पाळी माझी आहे’, असं पत्नीने प्रत्युत्तर दिलं.
हेही वाचा- अनुयायी तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापू दोषी, न्यायालयाचा मोठा निर्णय
यावरून नवरा बायकोमध्ये वादाची ठिणगी पडली, यातून आरोपी पत्नीने पत्नीला कानशिलात लगावली. यामुळे पीडित पत्नीच्या कानातील आतील बाजूस दुखापत झाली. तसेच तिच्या श्रवणावर परिणाम झाला. यानंतर पीडित महिलेनं बोरिवली पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी पतीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. याबाबतचं वृत्त ‘मिड डे’नं दिलं आहे.