मुंबई : संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या १०६ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दक्षिण मुंबईत उभारण्यात आलेल्या हुतात्मा चौकाच्या दूरवस्थेवरून शुक्रवारी पालिका महासभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हुतात्मा स्मारकासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद न केल्याबद्दल शिवसेना (ठाकरे) पक्षाने सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडले.
हुतात्मा स्मारकासाठी निधी नसेल तर आमचा विकासनिधी परत घ्या, असा खोचक सल्ला विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिला. महापालिकेकडे निधीची कमतरता नाही, असे प्रत्युत्तर महापौर रितू तावडे यांनी दिले. तसेच या प्रकरणी निधीच्या तरतुदीसह अहवाल सादर करावा, असे निर्देश रितू तावडे यांनी दिले.
दक्षिण मुंबईत फोर्ट परिसरातील हुतात्मा स्मारकाची दूरवस्था झाली असून या स्मारकाची दुरुस्ती, डागडुजी करण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी मुंबई महापालिका सभागृहात मांडला. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. अंकित प्रभू यांच्या मुद्द्याला काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनीही समर्थन दिले. काँग्रेसने दिलेल्या समर्थनानंतर सत्ताधाऱ्यांनी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) पक्षावर चांगलीच टीका केली.
आमचा निधी घ्या…
हुतात्मा स्मारकासाठी निधी नसेल तर आमचा सगळ्यांचा २५ लाखांचा विकास निधी घ्या, असा खोचक टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर झाला असून त्यात या स्मारकाच्या डागडुजीसाठी तरतूद न केल्याबद्दल त्यांनी प्रशासनावर टीका केली. मुंबई महापालिकेकडे निधीची कमतरता नाही, तुम्हाला दिलेला निधी परत देण्याची गरज नाही, तो नागरिकांसाठी दिलेला निधी आहे, असे प्रत्युत्तर रितू तावडे यांनी दिले.
काँग्रेसला बोलण्याचा हक्कच नाही
हुतात्मा स्मारकाच्या विषयावर काँग्रेसने बोलणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा टोला शिवसेना (शिंदे) पक्षाचे गटनेते अमेय घोले यांनी लगावला. ज्यांच्यामुळे हुतात्मे झाले त्यांनी या स्मारकाबद्दल बोलू नये, असे घोले म्हणाले. तर काँग्रेसला हुतात्मा स्मारकाविषयी आलेला उमाळा म्हणजे पुतनामावशीचे प्रेम असल्याची टीका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी केली. शिवसेना (ठाकरे) पक्षाला काँग्रेसचे समर्थन घ्यावे लागते यासारखे दुर्दैव नाही, असेही शिंदे म्हणाले.
इतक्या वर्षात का तरतूद केली नाही
सभागृह नेते गणेश खणकर यांनी यावेळी शिवसेना (ठाकरे) पक्षावर टीका केली. इतक्या वर्षात हुतात्मा स्मारकासाठी तुम्ही निधीची तरतूद का केली नाही, असा सवाल त्यांनी केला. फ्लोरा फाऊंटनची दुरुस्ती करण्यात आली, पण हाकेच्या अंतरावर असलेल्या हुतात्मा स्मारकाचा विसर का पडला, असा सवालही खणकर यांनी केला.
