भाजपच्या विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित समजले जात असतानाच पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपणही मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असून, आपल्या नावाचीही पक्षामध्ये चर्चा असल्याचे म्हटले आहे. खडसे यांच्या या विधानामुळे नव्या नेत्याची निवड एकमताने होणार की परस्परांविरोधात दावेदारी केली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड मंगळवारी दुपारी होणार आहे. या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून गृहमंत्री राजनाथसिंह आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जे. पी. नड्डा हे उपस्थित राहणार आहेत. नव्या नेत्याची निवड एकमताने व्हावी, यासाठी भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील नेते प्रयत्नशील आहे. मात्र, खडसे यांच्या या विधानामुळे विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
भाजपचे माजी महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडी आणि ओम माथूर यांनी मंगळवारी दुपारी एकनाथ खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अनौपचारिक चर्चा करण्यासाठीच आम्ही खडसे यांची भेट घेतल्याचे रुडी यांनी भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. पक्षामध्ये नेतानिवडीवरून कोणताही वाद नसून, राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत एकमताने नव्या नेत्याची निवड होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यानंतर वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत खडसे यांनी अद्याप कोणत्याही नेत्याचे नाव विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून निश्चित झालेले नसून, माझ्या नावाची सुद्धा विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून चर्चा असल्याचे सांगितले.