हुंडाबळीच्या गुन्ह्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपण निर्दोष असल्याचा दावा केला. यावेळी करण्यात आलेले सर्व आरोप राधे माँने फेटाळून लावले. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून माझी देवावर श्रद्धा आहे. तो माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही, मी निर्दोष आहे, असे राधे माँ म्हणाली.  तसेच निक्की गुप्ताने केलेले आरोप जर सिद्ध झाले तर आत्मदहन करून घेण्यास तयार असल्याचेही राधे माँने सांगितले.  आरोपांना प्रत्युत्तर देताना राधे माँने शायरी केली, ‘सच्चाई छुप नही सकती बनावट के वसूलों से, खूशबू आ नहीं सकती कागज के फूलों से।’, असे राधे माँ यावेळी म्हणाली.
दरम्यान, पोलिसांनी या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. राधे माँला हुंडाबळीच्या गुन्ह्याप्रकरणी रविवारी पोलिसांनी समन्स बजावले. त्यामुळे त्यांना चार दिवसांच्या आत कांदिवली पोलीस ठाण्यात हरज राहावे लागणार आहे. सासरच्या कुटुंबियांकडून आपला शारिरीक आणि मानसिक छळ होत असून त्याला आध्यात्मिक धर्मगुरू सुखविंदर कौर उर्फ राधे माँ जबाबदार असल्याचा आरोप निक्की गुप्ता या विवाहितेने केला होता. निक्की हिने दिलेल्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी नुकतीच राधे माँसह सात जणांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.