“मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी बनवले असून ते दलदलीत बांधले नाही.”; अशा शब्दात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. जनआशिर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे हे वसई-विरार शहराच्या दौऱ्यावर आहेत. तसेच, यावेळी त्यांनी, “मी घरात बसून काम करत नाही.” असा टोला देखील लगावला व आदित्य ठाकरे हे चिरंजीव मंत्री असल्याचेही ते म्हणाले.

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद यात्रा सुरू असून शनिवारी त्यांनी वसई विरार शहराचा दौरा केला. यात्रेदरम्यान त्यांनी वसईतील उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. जेवढी कामे मी केली आहेत, त्यापेक्षा एक दशांश कामे देखील उध्दव ठाकरे यांनी केलेली नसल्याचे ते म्हणाले. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी त्या स्मारकाचे शुध्दीकरण करून घेतले होते, त्याबद्दल त्यांनी पुन्हा शिवसैनिकांर निशाणा साधला. शुध्दीकरणाचे उद्योग करण्यापेक्षा उद्योग उभारून रोजगार निर्मिती करा, असे ते म्हणाले.

तसेच, “मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी आणि दलदलीच्या जागेत न बांधता चांगल्या जागेत बांधले आहे.”, असे राणेंनी यावेळी बोलून दाखवले. याचबरोबर, “मी घरात बसून काम करत नाही किंवा व्यासपीठावर डावी उजीवकडे बघून उत्तरे देत नाही. मी जेवढी कामे केली त्याच्या एक दशांश कामे देखील उध्दव ठाकरे यांनी केली नाही. ” असेही म्हणाले. तर, “नगरविकास मंत्री हे केवळ सही पुरते असून मातोश्रीच्या संमतीशिवाय एकाही फायलीवर सही होत नाही.” असा आरोपही यावेळी राणेंनी केला.

“गोमूत्र शिंपडण्यापेक्षा रोजगार निर्माण करा”, नारायण राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र

तर, या अगोदर देखील राणेंनी शिवसेनेवर टीका केलेली आहे. “वीज पुरवठा नाही राज्यात म्हणून ३५० कंपन्या बंद आहेत. मी प्रयत्न करणार, इथल्या मंत्र्यांशीही बोलणार. ३५० कंपन्या बंद असल्याने ३ लाख कामगार आज बेरोजगार झाले आहेत. गोमूत्र शिंपडणाऱ्यांना हे माहिती नाही. ते शिंपडत राहण्यापेक्षा रोजगार द्या. नको ते उद्योग करण्यापेक्षा हवे ते व्यवसाय करावे. राज्यातील युवकांना रोजगार द्यावा. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करून द्या. देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातभार लावावा.” असं नारायण राणे म्हणालेले आहेत.