मुंबई : पदविका अभ्यासक्रमातील ‘आय स्कीम’ अभ्यासक्रमाचे पहिले व दुसरे उन्हाळी सत्र २०२६ च्या परीक्षेपासून बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) घेतला आहे. त्यामुळे या सत्रांमध्ये अनुतीर्ण झालेले, एटीकेटी असलेले किंवा अनेक वर्षांपासून परीक्षा प्रलंबित असलेले विद्यार्थी आता जुन्या ‘आय स्कीम’च्या विषयांमध्ये परीक्षा देऊ शकणार नाहीत. अशा विद्यार्थ्यांना ‘के स्कीम’ अभ्यासक्रमातील समतुल्य विषयांमध्येच परीक्षा द्यावी लागणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने राज्यातील तंत्रनिकेतन शिक्षण संस्थांमध्ये ‘के स्कीम’ ही नवीन अभ्यासक्रम रचना लागू केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम ‘के स्कीम’अंतर्गत सुधारित केली आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार विषय रचना आणि मूल्यमापन पद्धतीत बदल केले आहेत. या बदलाच्या प्रक्रियेचा पुढील टप्पा म्हणून आता ‘आय स्कीम’चे पहिले व दुसरे सत्र पूर्णतः बंद करण्यात येत आहे. हा बदल नवीन विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर ‘आय स्कीम’मध्ये अनुर्तीण झालेल्या विद्यार्थ्यांनाही लागू राहणार आहे.

या निर्णयामुळे इंग्रजी, बेसिक सायन्स, बेसिक मॅथेमॅटिक्स, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अप्लाइड मॅथेमॅटिक्स, इंजिनीअरिंग ड्रॉईंग, सी प्रोग्रामिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्सटाईल, फूड टेक्नॉलॉजी, प्रिंटिंग, मायनिंग, केमिकल, फॅशन अँड अपॅरल आदी अनेक विषयांचे ‘के स्कीम’मधील नव्या विषयांशी समतुल्यीकरण करण्यात आले आहे. मंडळाने संकेतस्थळावर यासंदर्भात पहिले सत्र आणि दुसरे सत्र अशा स्वतंत्र विषयनिहाय यादी प्रसिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना जुन्या विषयाऐवजी नव्या विषयाचीच नोंद करावी लागणार आहे. काही मोजके विषय मात्र नेहमीप्रमाणे ‘आय स्कीम’मध्येच सुरू राहणार असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी

‘आय’ स्कीमच्या पहिला किंवा दुसऱ्या सत्रात अनुतीर्ण झालेले विद्यार्थी जुन्या विषयांच्या नावाने परीक्षा देऊ शकणार नाहीत. त्यांनी ‘के स्कीम’मधील समतुल्य विषयाचे नाव, बदललेला अभ्यासक्रम आणि नवा अभ्यासक्रम कोड समजून घेणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम बदलल्यामुळे प्रश्नपत्रिकेची पद्धत (पॅटर्न), गुणांकन पद्धत आणि अभ्यास घटकांमध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी त्यानुसार अभ्यासाची तयारी करावी, अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत.

‘आय स्कीम’ म्हणजे काय ?

पदविका अभ्यासक्रमांसाठी २०१६ नंतर टप्प्याटप्प्याने लागू केलेला अभ्यासक्रम म्हणजे ‘आय स्कीम’ होय. यामध्ये अभ्यासक्रमाचे आधुनिकीकरण, विषयांची पुनर्रचना आणि सत्र पद्धतीत सुधारणा केली होती. अनेक वर्षे पदविका शिक्षणाचा कणा ठरलेली ही स्कीम पहिल्या व दुसऱ्या सत्रापर्यंत लागू होती. अभ्यासक्रम बदलांच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी २०२६ परीक्षेपासून ही स्कीम बंद करण्यात येत आहे. या स्कीममधील अनुतीर्ण विद्यार्थ्यांना जुन्या विषयांमध्ये परीक्षा देता येणार नाही.

‘के स्किम’ म्हणजे काय ?

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ‘के स्कीम’ची अंमलबजावणी सुरू झाली. यात कौशल्याधारित शिक्षण, उद्योगाभिमुख विषय, अद्ययावत अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धतीत बदल यावर भर दिला आहे. उन्हाळी २०२६ पासून पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या व दुसऱ्या सत्रासाठी ‘के स्कीम’ पूर्णतः लागू राहणार आहे. ‘आय स्कीम’मधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही ‘के स्कीम’मधील समतुल्य विषयांमध्येच परीक्षा द्यावी लागणार आहे.