जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या श्री क्षेत्र देहू येथील शिळा मंदिराचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमानंतर नव्या वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले. या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण झाले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषणाची संधी का देण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा उपस्थित करत, यावरून टीका देखील केली. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत पत्रकारपरिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंतप्रधानांनी अजित पवारांची विचारपूस केली. एवढच नाही तर अजित पवारांचं नाव नाही असं लक्षात आल्यावर, पंतप्रधानांनी स्वत: ‘अरे अजित पवार बोलणार नाहीत का? अजित पवार तुम्ही बोला’, असं म्हटलं. त्यानंतर अजित पवारांनी सांगितलं की, नाही आपणच बोला. हे सगळं काही लोकांना पाहावत नाही, त्यामुळे इतका चांगला कार्यक्रम झाल्यानंतर जाणीवपूर्वक अशाप्रकारे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय. मला तर असं वाटतय की कदाचित अजित पवारांच्या विरोधातच हे षडयंत्र आहे.”

…त्यामुळे मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं –

तसेच “मी माझा कयास व्यक्त केला आहे. राजकारणात आपल्याला प्रत्येक गोष्टी मागील अर्थ समजतो. एक आकलन असतं, त्याच्या आधारावर हे अंदाज असतात. त्यामुळे मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं. त्यात सत्य काय आहे?, कोणामुळे होतय?, काय आहे? हे शोधून काढणं काम तुमचं आहे ते माझं नाही.” असं देखील फडणवीसांनी पुढे बोलून दाखवलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी न देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना दिली होती. यानंतर राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. तर, माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनी सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावरून त्यांना काल प्रत्युत्तर दिले आहे.

…‘हा’ जर अपमान वाटत असेल, तर पवार कुटुंबीयांची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करावी – सदाभाऊ खोतांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर!

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषणाची संधी का नाही? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तिथे विरोधी पक्षनेत्यांना…”

“पंतप्रधानांच्या उपस्थितीत देहू येथे कार्यक्रम झाला. या ठिकाणी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी संधी देणे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या कार्यक्रमामध्ये अजित पवारांचे भाषण व्हावे यासाठी प्रोटोकॉल म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती करण्यात आली होती. पण पंतप्रधान कार्यालयाने विनंती स्वीकारली नाही. पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर अन्याय करण्यात आला आहे. आमच्या राज्याचा आमचा नेता व्यासपीठावर आहे. तिथे विरोधी पक्षनेत्यांना भाषण करु देता पण आमच्या नेत्यांना भाषण करु देत नाहीत. ही दडपशाही असून आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचे काम केले आहे. प्रोटोकॉलनुसार अजित पवारांना भाषण करण्याची संधी द्यायला हवी होती,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.