मुंबई : पंचतारांकित हॉटेल किंवा रस्त्यावरील विक्रेता असो वा गणेशोत्सवातील महाप्रसाद असो, कोणीही अन्न सुरक्षेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई अटळ आहे, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. सणासुदीच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच, प्रत्येक सणाच्या आधी, सणादरम्यान व सणानंतर नियामकांनी कोणती पावले उचलावीत, याचे नियोजन केले आहे. यासंदर्भातील नियमावली गुरुवारी जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई, अस्वच्छ खाद्यपदार्थ व नियमबाह्य अन्नविक्रीवर एफडीएची विशेष नजर राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

अन्न सुरक्षा, मिठाई, शालेय पोषण आहार, औषधे, रक्तपेढ्या तसेच सणासुदीतील तपासणी मोहिमेबाबत मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित वार्तालाप कार्यक्रमात मुंढे यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. दरवर्षी सणासुदीच्या काळात कारवाईसंदर्भात आदेश काढले जातात. मात्र, हे आदेश प्रत्येक सणानुसार स्वतंत्र व व्यापक स्वरूपाचे नसतात. सणासुदीच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळामध्ये कारवाई करण्यासाठी सण आणि उत्सव लक्षात घेऊन १२ महिन्यांचे एक कॅलेंडर तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये ख्रिसमस, दिवाळी, ईद अशा सर्व सणांचा समावेश आहे.

या सणादरम्यान नियामकांनी कोणत्या तारखेपासून कोणत्या प्रकारच्या उपाययोजना कराव्यात, याची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. सणापूर्वी, सणाच्या काळात आणि सणानंतर अशा चार टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. ही व्यवस्था लवकरच लागू करण्यात येणार असून, गुरूवारी त्यासंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे गणेशोत्सव, नवरात्रौत्सवामध्ये महाप्रसाद किंवा भंडाऱ्याचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. यावेळी महाप्रसाद किंवा जेवण बनविणाऱ्या व्यक्तीसाठी अन्न सुरक्षा नियम लागू होतात. त्याच्याकडे नोंदणी आणि परवाना असणे आवश्यक आहे. निर्धारित मानके आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परवान्याशिवाय किंवा निर्धारित मानकांचे पालन न करता अन्नपदार्थ तयार करून त्याचे वाटप करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. उत्सव असो किंवा नसो, प्रत्येक अन्न व्यवसाय चालकाने परवाना घेतलेला किंवा नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

निर्धारित प्रक्रिया आणि नियमांनुसारच अन्न तयार केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. सणासुदीच्या काळातही जास्त चरबीयुक्त, जास्त साखरयुक्त आणि जास्त मीठ असलेले एचएफएसएस पदार्थ टाळावेत. ते खायचे असल्यास मर्यादित प्रमाणात खावेत. त्याऐवजी पौष्टिक आणि संतुलित आहार घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

३१०० अन्न व्यवसाय चालकांची तपासणी

३१ जुलैपर्यंत अन्न क्षेत्रातील ३१०० पेक्षा अधिक अन्न व्यवसाय चालकांची तर औषध क्षेत्रातीलही सुमारे १०० तपासण्या करण्यात आल्या. तपासणीदरम्यान १६५ परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आणि ७५० पेक्षा अधिक आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या. उर्वरित आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गंभीर त्रुटी आढळल्या नाहीत. या १६५ निलंबनांपैकी सुमारे १०० जणांनी अपील केले. त्यातील ७० जणांना दिलासा देण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये अंतिम आदेश जारी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुंढे यांनी सांगितले.