मुंबई : देशातील सर्वाधिक कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. देशभरातून ६९ हजार ५९१ विद्यार्थांनी दिलेल्या या परीक्षेमध्ये २ हजार ४४५ जण दोन्ही गटामध्ये उत्तीर्ण झाले. सीए अंतिम परीक्षेचा निकाल हा १०.९७ टक्के इतका लागला आहे.
यंदा जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम या परीक्षेसाठी देशभरातून तब्बल ६९ हजार ५९१ जणांनी परीक्षा दिली. या परीक्षेत हरियाणामधील कर्नाल शहरातील दीक्षा गोयल हिने ६०० पैकी ४८६ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. तिला ८१ टक्के गुण मिळाले. हिमाचल प्रदेशमधील पोंटा साहिब या शहरातील अनिरुद्ध गर्ग याने ४५२ गुणांसह दुसरा क्रमांक पटकालवला. तसेच ऋषभ जैन (नवी दिल्ली) आणि ध्रुव देंबला (सोनीपत) यांनी समान गुणांसह संयुक्तरित्या तिसरा क्रमांक पटकावला.
भारतासह परदेशामध्ये ५७६ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये गट १ मधून ५३ हजार ६५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ११ हजार २८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गट १ चा निकाल हा २१.०३ टक्के इतका लागला. तसेच गट २ मधून ३८ हजार १६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३ हजार ७२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने या परीक्षेचा निकाल ९.७६ टक्के इतका लागला. त्याचप्रमाणे गट १ व गट २ अशी दोन्ही गटांमध्ये २२ हजार २९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २ हजार ४४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण १०.९७ टक्के इतके आहे.
दरम्यान, ग्रुप १ मध्ये तुलनेने समाधानकारक निकाल लागला असला, तरी ग्रुप २ आणि दोन्ही ग्रुप एकत्रित उत्तीर्णतेचे प्रमाण कमी असल्याने परीक्षेची काठिण्यपातळी उच्च असल्याचे पुन्हा अधोरेखीत झाले.
आयसीएआयचे अध्यक्ष सीए प्रसन्न कुमार यांनी यशस्वी विद्यार्थी, त्यांचे शिक्षक आणि कुटुंबीय यांचे अभिनंदन केले. या परीक्षा अत्यंत कठीण असूनही विद्यार्थी त्यांच्या चिकाटीमुळे आणि तयारीमुळे हा टप्पा पूर्ण करत आहेत. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जे विद्यार्थी सनदी लेखापाल झाले, त्यांनी उच्च नैतिक मूल्यांसह देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचा वाटा उचलावा, अशी आशा कुमार व्यक्त केली.
गटनिहाय निकाल
गट—-परीक्षार्थी संख्या—-उत्तीर्ण संख्या—-पास टक्केवारी
गट १—–५३,६५२—–११,२८२—–२१.०३%
गट २—–३८,१६९—–३,७२६—–९.७६%
दोन्ही गट—-२२,२९३—–२,४४६—-१०.९७%
