मुंबई : देशातील वैद्यकीय संशोधन आणि नवसंशोधनाला चालना देण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (आयसीएमआर) ‘मेडिकल इनोव्हेशन्स पेटंट मित्र’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत देशभरातील वैद्यकीय महाविद्यालये, संशोधन संस्था, डॉक्टर, संशोधक आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्यविषयक संशोधनांचे पेटंट संरक्षण आणि तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी पूर्णतः सरकारी खर्चातून मदत करण्यात येणार आहे.
देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये करण्यात येणारे संशोधनाचे प्रमाण फारच कमी आहे. तसेच होणाऱ्या संशोधनाचे पेटंट घेण्यासाठी अर्ज दाखल करणे, तांत्रिक, कायदेशीर सहाय्य, तंत्रज्ञान हस्तांतरण प्रक्रिया आणि आर्थिक अडचणींना संशोधकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेक संशोधक हे पेटंट करण्यापासून दूर राहतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांनी केलेल्या संशोधनाचे प्रत्यक्ष उत्पादन किंवा उपचार पद्धतीमध्ये रुपांतर होण्यास अडचणी येतात. त्यामुळे समाजाला प्रभावी आणि आधुनिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागते.
ही बाब लक्षात घेत आयसीएमआरने देशातील वैद्यकीय महाविद्यालयांतील संशोधकांच्या संशोधनातून निर्माण झालेल्या तंत्रज्ञानाचे रूपांतर प्रत्यक्ष आरोग्यसेवा उत्पादने व उपचार पद्धतींमध्ये करण्यासाठी आणि संशोधकांना त्यांच्या बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आयसीएमआरने ‘मेडिकल इनोव्हेशन्स पेटंट मित्र’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत देशातील संशोधन प्रयोगशाळा आणि वैद्यकीय संस्थांमध्ये विकसित होणाऱ्या नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञान, उपकरणे आणि आरोग्यविषयक उपाययोजनांना पेटंट मिळवून देणे, तसेच त्यांचे व्यावसायिकीकरण सुलभ करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे.
वैद्यकीय शिक्षणामध्ये संशोधन, नवकल्पना आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या या उपक्रमाबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून (एनएमसी) सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्थांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये या उपक्रमाची माहिती व्यापक स्तरावर प्रसारित करण्याचे आणि नवसंशोधकांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन एनएमसीचे सचिव डॉ. राघव लांगर यांनी केले आहे.
एनएमसीने सर्व वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये आणि संशोधन संस्थांना या उपक्रमाची माहिती प्राध्यापक, चिकित्सक, संशोधक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना विकसित करणाऱ्या संशोधकांना पेटंट मित्र पोर्टलचा सक्रिय वापर करण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रिया आयसीएमआरच्या ‘पेटंट मित्र’ पोर्टलवर उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही शंका किंवा मार्गदर्शनासाठी वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्था आयसीएमआरशी थेट संपर्क साधू शकतात.
वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन, नवनवीन उपचार पद्धती, निदान तंत्रज्ञान, वैद्यकीय उपकरणे किंवा आरोग्यसेवेशी संबंधित कोणतीही अभिनव संकल्पना विकसित करणाऱ्या संशोधकांसाठी ‘पेटंट मित्र’ उपक्रम ही एक मोठी संधी मानली जात आहे. या माध्यमातून देशातील संशोधनाला जागतिक स्तरावर मान्यता मिळण्याबरोबरच आरोग्य क्षेत्रातील आत्मनिर्भरतेलाही बळ मिळणार आहे. या उपक्रमामुळे वैद्यकीय संशोधनाचे प्रत्यक्ष आरोग्यविषयक उपायांमध्ये रूपांतर अधिक वेगाने होईल आणि भारताचा आरोग्य नवसंशोधन क्षेत्रातील जागतिक दर्जा अधिक मजबूत होण्याबरोबरच आर्थिक अडचणींमुळे पेटंट नोंदणीपासून दूर राहणाऱ्या संशोधकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
