मुंबई : करोना लसीकरणामुळे नागरिकांचा मृत्यू होत असल्याचा दावा कर्नाटकमधील सिद्धरामय्या यांनी केला आहे. मात्र भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्र (एनसीडी) यांनी केलेल्या अभ्यासातून करोना लसीकरण आणि प्रौढांचे अचानक झालेले मृत्यू यांचा एकमेकांशी कोणताही थेट संबंध नसल्याचे सिद्ध झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच भारतातील करोना लस ही सुरक्षित आणि प्रभावी असून, तिच्यामुळे अत्यंत दुर्मिळ गंभीर दुष्परिणाम असल्याचेही या अभ्यासातून स्पष्ट करण्यात आले आहे.
१८ ते ४५ वयोगटातील तरुणांमध्ये, अकारण अचानक होणाऱ्या मृत्यूंमागील कारणे समजून घेण्यासाठी आयसीएमआर आणि एनसीडीसी या संस्था एकत्रित काम करीत आहेत. या संस्थांची मागील माहितीच्या आधारे एक आणि सध्याच्या परिस्थितीवर आधारित दुसरा अभ्यास केला. वेगवेगळ्या संशोधन पद्धतींचा वापर करून एकमेकांस पूरक असे दोन अभ्यास करण्यात आले. ‘भारतातील १८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या अकारण, अचानक मृत्यूंशी संबंधित घटक – एक बहुकेंद्रित – नियंत्रण रोगाभ्यास’ या शीर्षकाखाली आयसीएमआरच्या राष्ट्रीय महामारी विज्ञान संस्थेने (एनआयई) केलेल्या अभ्यासामध्ये करोना लसीकरणामुळे तरुण व प्रौढांमध्ये अचानक मृत्यूचा धोका वाढत नसल्याचे आढळून आले.
तरुणांमध्ये अचानक मृत्यूची सर्वसाधारण कारणे निश्चित करण्यासाठी ‘तरुणांमधील अकारण झालेल्या अचानक मृत्यूची कारणमिमांसा’ हा दुसरा अभ्यास करण्यात आला. हृदयविकाराचा झटका किंवा मायोकार्डियल इन्फेक्शन हे या वयोगटातील व्यक्तीच्या अचानक मृत्यूचे प्रमुख कारण आहे. अचानक झालेल्या बहुतेक मृत्यू प्रकरणांमध्ये, अनुवांशिक उत्परिवर्तन हे या मृत्यूंचे संभाव्य कारण असल्याचे या अभ्यासाच्या प्राथमिक विश्लेषणातून दिसून आले. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर अंतिम अहवाल सामायिक केला जाणार आहे. हा अभ्यास नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) आणि आयसीएमआरमार्फत करण्यात आला. या अभ्यासातून करोना लसीकरणामुळे धोका वाढत नाही, हे देखील उघड झाले, तसेच आरोग्य समस्या, अनुवांशिक पूर्वस्थिती आणि धोकादायक जीवनशैलीची ही अशा अचानक मृत्यूची संभाव्य कारण असू शकतात. करोना लसीकरणाचा अचानक मृत्यूशी संबंध असल्याचे विधान असत्य आणि दिशाभूल करणारे आहे आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून त्याचे समर्थन होत नसल्याचे आयसीएमआरकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
करोना लस नागरिकांसाठी जीवदान ठरली आहे. तिच्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याचे प्रमाण ०.०१ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच करोना लस घेतल्यानंतर दोन वर्षांनंतर मृत्यू होऊ शकत नाही. करोना लस जीवघेणी असू शकत नाही, असे करोना काळामध्ये स्थापन करण्यात आलेल्या करोना कृती दलाचे तत्कालिन प्रमुख व सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाचे क्रिटिकल केअर विभाग प्रमुख डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.
करोना लसीमुळे कोणालाही त्रास झाल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही. करोना लस घेतल्यामुळे धडधाकट व्यक्तीचा मृत्यू होऊ शकत नाही. तसेच मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा सहव्याधी असलेल्या व्यक्तीने करोना लस घेतली असेली तर त्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण लस असू शकत नाही. सहव्याधींमुळे त्याचा मृत्यू झाला असू शकतो, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली.