मुंबई : कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन या शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी (आयसीएसई), बारावीच्या (आयएससी) परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. देशभरात दहावीच्या परीक्षेचा निकाल ९९.१८ टक्के, तर बारावीचा निकाल ९९.१३ टक्के लागला. या दाेन्ही परीक्षांमध्ये देशातील मुलींनी बाजी मारली. देशामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मुलींचा निकाल अनुक्रमे ९९.४६ टक्के व ९९.४८ टक्के लागला.

आयसीएसई व आयएससी या दोन्ही परीक्षांचा निकाल कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनच्या (सीआयएससीई) अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. आयसीएसई परीक्षेत ६७ विषयांचा समावेश होता, ज्यात २० भारतीय आणि १४ परदेशी भाषा होत्या. आयएससी परीक्षेत ४५ विषय घेण्यात आले, ज्यात १३ भारतीय आणि २ परदेशी भाषा होत्या.

देशभरातून आयसीएसई (दहावी) परीक्षेसाठी २ लाख ५८ हजार ७२१ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये मुलांची संख्या १ लाख ३७ हजार ५०३, तर मुलींची संख्या १ लाख २१ हजार २१८ इतकी होती. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या या विद्यार्थ्यांपैकी २ लाख ५६ हजार ५९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलांची संख्या १ लाख ३६ हजार ३२ (९८.९३ टक्के), तर मुलींची संख्या १ लाख २० हजार ५५८ (९९.४६ टक्के) इतकी होती. निकालाची टक्केवारी ९९.१८ इतकी आहे.

आयसीएसईप्रमाणे आएससी म्हणजे बारावीचा निकालही मंडळाने जाहीर केला. बारावीच्या परीक्षेला देशातून १ लाख ३ हजार ३१६ विद्यार्थी बसले होते. यामध्ये मुलांची संख्या ५४ हजार ११८, तर मुलींची संख्या ४९ हजार १९८ इतकी होती. बारावीच्या परीक्षेला बसलेल्यांपैकी १ लाख २ हजार ४१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांची संख्या ५३ हजार ४७२ (९८.८१ टक्के), तर मुलींची संख्या ४८ हजार ९४२ (९९.४८ टक्के) इतकी आहे. बारावीच्या निकालाची टक्केवारी ९९.१३ इतकी आहे.

मुलींची आघाडी कायम

आयसीएसई व आयएससी या दोन्ही परीक्षांमध्ये देश-विदेशामध्ये मुलींनी पुन्हा बाजी मारली आहे. आयसीएसईमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.४६ टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.९३ टक्के आहे. तसेच आयएससीमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.४८ टक्के, तर मुलांचे प्रमाण ९८.८१ टक्के आहे. यावरून दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये मुलींनी बाजी मारल्याचे स्पष्ट होते.

प्रादेशिक विभागात पश्चिम व दक्षिण आघाडीवर

आयसीएसई परीक्षेत पश्चिम विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.८५ टक्के, तर दक्षिण विभागाचा निकाल ९९.८१ टक्के लागला. तसेच आयएसी परीक्षेत दक्षिण विभागाने ९९.८७ टक्के अव्वल स्थान पटकावले, तर पश्चिम विभागने दुसरा क्रमांक पटकावला असून या विभागाचा निकाल ९९.५५ टक्के लागला.

महाराष्ट्राचा निकाल ९९ टक्क्यांपेक्षा जास्त

महाराष्ट्रातून आयसीएसई परीक्षेला ३० हजार ३९३ विद्यार्थीबसले होते. यामध्ये मुलांची संख्या १६ हजार १८१ आणि मुलींची संख्या १४ हजार २१२ होती. यापैकी ३० हजार ३७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुले व मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.९३ टक्के इतके आहे. तसेच अयएससी परीक्षेला बसलेल्या ४ हजार ६१ विद्यार्थापैकी ४ हजार ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.९५ टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.७९ टक्के इतके आहे.