शिक्षक प्रशिक्षणांसाठी ‘वंदे महाराष्ट्र’

बदललेला अभ्यासक्रम, पाठय़पुस्तके यांच्या अनुषंगाने शिक्षकांना प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

|| रसिका मुळ्ये

राज्याची स्वतंत्र वाहिनी सुरू करण्याचा विचार

मुंबई : राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्याची स्वतंत्र वाहिनी ‘वंदे महाराष्ट्र’ सुरू करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ‘वंदे गुजरात’ वाहिनीवरून प्रशिक्षण देण्यात आल्यामुळे वाद झाला होता.

बदललेला अभ्यासक्रम, पाठय़पुस्तके यांच्या अनुषंगाने शिक्षकांना प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. दोन वर्षांपासून शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. एकाच वेळी राज्यभरात सर्वाना प्रशिक्षण देण्यासाठी ते गुजरातमधील ‘वंदे गुजरात’ या वाहिनीच्या माध्यमातून देण्यात आले होते. त्यावरून हे प्रशिक्षण वादात सापडले होते. आता ‘वंदे गुजरात’च्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याऐवजी राज्याची वाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अधिकारी गुजरातमध्ये प्रशिक्षण घेणार असून या वाहिनीसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या निधीतून ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्याशिवाय केंद्र शासनाचा निधी या प्रकल्पाला मिळणार आहे.

बालचित्रवाणीचा बळी

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या तरतुदीच्या मध्यमातून १९८४ मध्ये बालचित्रवाणी ही संस्था सुरू करण्यात आली होती. बालचित्रवाणीचे कार्यक्रम अनेक वर्षे दूरदर्शनवरून प्रक्षेपित करण्यात येत होते.  संस्थेला पाठबळ देण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली, परंतु प्रत्यक्षात संस्था २०१७ मध्ये बंद करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च परवडत नसल्याचे कारण देण्यात आले. विभागाची अनेक वर्षे कार्यरत असलेली संस्था बंद करून आता नवी वाहिनी सुरू करण्याचा घाट घालण्यात येत आहे.

ऑनलाइनला विरोध: शिक्षकांचा ऑनलाइन प्रशिक्षणाला विरोध आहे. ऑनलाइन प्रशिक्षण एकतर्फी होत असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला होता. मात्र शिक्षण विभागाने ऑनलाइन प्रशिक्षणाचा हट्ट कायम ठेवल्याचे दिसते.

यंदा प्रशिक्षणे नाहीतच  : प्रशिक्षणांसाठी निधी नसल्याचे सांगत यंदा शिक्षण विभागाने बदललेल्या अभ्यासक्रमांची प्रशिक्षणे घेतलीच नाहीत. प्रत्यक्षात समग्र शिक्षण अभियानाच्या वार्षिक नियोजनानुसार केंद्राकडून साधारण ४४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, वर्ष संपत आले तरीही अद्याप प्रशिक्षणे झालेली नाहीत.

 

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Idea launching independent channel of the state vande maharashtra akp

ताज्या बातम्या