मुंबई : मुंबईत रेल्वे रुळांवर पाणी साचणाऱ्या २५ ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी पालिकेने उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर लोकल बंद पडतात, त्यावेळी अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी सोयीसुविधा द्याव्यात, बसगाडय़ा, एसटीची व्यवस्था करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

लोकल बंद पडल्या की टॅक्सीवाले खूप भाडे आकारतात, कामावर जाण्यासाठी किंवा परतणाऱ्या प्रवाशांच्या खिशात प्रत्येकवेळी पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे त्यांना सुखरूप घरी जाता यावे यासाठी सावर्जनिक परिवहन सेवा द्यावी, तसेच चहा, नाश्ताची सोय करावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेल्यानंतर मंगळवारी प्रथमच पालिका मुख्यालयात भेट दिली. मुंबईत कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.  

मुंबईत पाणी साचणाऱ्या ठरावीक २५ ठिकाणी पालिकेने विशेष काळजी घ्यमवी, उपाययोजना कराव्यात, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका कराव्यात, अशी सूचना शिंदे यांनी दिली. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने यंदा चांगले काम केले असल्यामुळेच मुंबईत पाणी साचले नसल्याचे चित्र नियंत्रण कक्षात दिसत असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. रस्त्यांचा दर्जा सुधारणार मुंबईत रस्त्यावरील खड्डय़ांमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा तोंड द्यावे लागते. त्यामुळे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा मानस आहे. सध्या कोल्डमिक्सचा वापर करून रस्त्यावरील खड्डे तत्काळ भरण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

महापालिकेचे अप्रत्यक्ष कौतुक

नालेसफाई, पाणी साचणे या मुद्दय़ांवरून भाजपने पालिका प्रशासन आणि शिवसेनेवर नेहमीच टीका केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंद याबाबत काय बोलतात याकडे सगळय़ांचे लक्ष लागले होते. मात्र मुंबईत पाणी भरण्याची ठिकाणे कमी झाल्याचे सांगून यंदा हिंदूमाता येथे पाणी साचले नाही. त्यामुळे पालिकेने चांगले काम केले आहे, अशा शब्दांत त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. आपण या गोष्टीचा नकारार्थी विचार करू नका, असेही ते यावेळी प्रसारमाध्यमांना उद्देशून म्हणाले.

जलमय भाग कमी झाल्याचा दावा

तीन दिवसांत ५०० मिमी पाऊस गेल्या तीन दिवसांत मुंबईत ५०० मिमि पाऊस पडला. मंगळवारी दुपापर्यंत १६० मिमी पाऊस पडला, सोमवारी २०० मिमी पाऊस पडला. मात्र पाण्याचा निचरा वेगाने झाला असल्याचे मत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केले. ५३९७ कॅमेऱ्यांनी मुंबईवर लक्ष ठेवले जात आहे. गेल्या पावसाळय़ाच्या तुलनेत यावेळी जलमय होणारे भाग कमी झाले आहेत, असेही ते म्हणाले.