scorecardresearch

दिवाळीच्या तोंडावर बिल्डरांचा ग्राहकांसाठी ऑफर्सचा ‘धमाका’

विकल्या न गेलेल्या घरांमुळे चिंतीत असलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी घरखरेदीसाठी असलेला दीपावलीचा मुहर्त साधण्यासाठी नेहमीप्रमाणे ग्राहकांना आकर्षित करायला अनेक ऑफर्स आणल्या आहेत.

दिवाळीच्या तोंडावर बिल्डरांचा ग्राहकांसाठी ऑफर्सचा ‘धमाका’
(संग्रहित छायाचित्र)

दिवाळी म्हटलं की खरेदी आली, त्यातही नवं घर घेण्याची उत्सुकता ग्राहकांमध्ये नेहमीच पाहायला मिळते. विकल्या न गेलेल्या घरांमुळे चिंतीत असलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी घरखरेदीसाठी असलेला दीपावलीचा मुहर्त साधण्यासाठी नेहमीप्रमाणे ग्राहकांना आकर्षित करायला अनेक ऑफर्स आणल्या आहेत. यात सोन्याची नाणी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसारख्या भेटवस्तूंबरोबरच दुचाकी आणि चारचाकी कार देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षभरात बांधकाम क्षेत्रांत अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय झाले. यामुळे बांधकाम क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडल्याने परिणामी बांधकाम क्षेत्रांवर त्याचा विपरित परिणाम झाला अशी ओरड बिल्डर वर्गाकडून करण्यात आली. त्यातही नोटबंदीनंतर मुंबईत घरांमध्ये गुंतवणूक थांबल्याचे चित्र पाहायला मिळाले. ही पोकळी भरून काढण्यासाठी आणि बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी बिल्डरांकडून यंदाच्या दिवाळीत सर्वसामान्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या ऑफर्स आणल्या आहेत.

यामध्ये यंदा मालाड आणि भिवंडी प्रोजेक्टसाठी मोफत स्टँप ड्युटी-रजिस्ट्रेशन, गृहिणीला हव्याहव्याशा वाटणारं ‘मॉड्युलर किचन’, फ्रीज, फर्निचर, सोन्यांची नाणी, दुचाकी तसेच चारचाकी वाहन भेट अशा अनेक ऑफर घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ठेवण्यात आल्याचे संघवी पार्श्व ग्रुप ऑफ कंपनीचे सीएमडी रमेश संघवी यांनी सांगितले. सर्वसामान्यांना परवडणारी घरे उभारण्यात निर्वाणा रिअल्टी नेहमीचं अग्रेसर राहिले आहेत. दिवाळीत सर्वसामान्यांना कमी किंमतीत घरे उपलब्ध करून देण्याबरोबरच घरात पूर्णपणे फर्निचर देण्याचा आमचा मानस असल्याचे निर्वाणा रिअँल्टीचे सीईओ पुनीत अग्रवाल यांनी सांगितले. तर, दरवर्षीप्रमाणे यंदाच्या दिवळीतही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट मिळेल, अत्यंत कमी आणि परवडणाऱ्या दरामध्ये कल्याण येथे आम्ही 1 आणि 2 बीएचके घरं, दुकानांसाठीचे गाळे उपलब्ध करुन दिले आहेत. आमच्या या प्रकल्पात ग्राहकांना उत्कृष्ठ लाइफस्टाइलचा अनुभव घेता येईल. असं हावरे ग्रुपचे सीईओ अमित हावरे यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: If you want to buy house in mumbai there is diwali gift for customers from builders