मंजुळा शेटय़े हत्येच्या चौकशीची जबाबदारी महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्याकडे
मंजुळा शेटय़े हत्याकांडातील कारागृहातील आरोपी महिला पोलिसांना सहानुभूती दाखविल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याकडून अंतर्गत चौकशीची जबाबदारी काढून घेण्यात आली. गुरूवारी हा निर्णय कारागृह विभागाने घेतला. आता ही चौकशी महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्याकडे सोपविण्यात आली. राजवर्धन ही चौकशी नव्याने करतील, अशी माहिती मिळते.
गुन्हे शाखेने आरोपी महिला पोलिसांना अटक केल्यानंतर साठे यांनी वॉट्सअॅप ग्रुपवर सहानुभूती दाखवणारा, त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहाण्याचे आवाहन करणारा संदेश लिहिला होता. त्याबाबत त्यांची मुख्यमंत्र्यांकडे, कारागृह विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या दरम्यान, साठे यांनी अंतर्गत चौकशीच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती करणारा अर्ज वरिष्ठांकडे केला होता.
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या साठे यांच्याविरोधात २००२मध्ये भायखळा कारागृहातील एका पुरूष अधिकाऱ्याने लैंगिक छळाचा आरोप केला होता. या तक्रारीवर पोलीस दक्षता पथकाने चौकशी केली. पथकाने आरोपात तत्थ्य असून साठे यांचे गैरवर्तन आढळून आल्याचा अहवाल अतिरिक्त महासंचालक कार्यालयाकडे धाडला. तसेच कारवाईची शिफारसही केली. मात्र तो अहवाल पुढे गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलाच नाही, असा दावा ठाणे कारागृहाचे निलंबीत अधिक्षक हिरालाल जाधव यांनी केला. त्यांनी मे महिन्यात अतिरिक्त महासंचालक कार्यालयाला स्मरणपत्र धाडून साठे यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.
याबाबत साठे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दूरध्वनी घेतला नाही. तर अतिरिक्त महासंचालक उपाध्याय यांनी हे प्रकरण खुप जुने आहे, त्याबाबत माझ्याकडे काहीही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया दिली.