निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक बसवून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या महावीर इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दस्तुरखुद्द पालिका आयुक्तांनी देऊन  आठवडा झाला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आयुक्तांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून पालिका अधिकारी या कंपनीला पाठिशी घालत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे.
कुर्ला परिसरामधील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम महावीर इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीने केले होते. या रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आल्याचे एसजीएल कंपनीने केलेल्या तपासणीत आढळून आले होते. त्यामुळे प्रशासनाने तीन सदस्यांच्या समितीची नियुक्ती करून या प्रकरणाची चौकशीही केली. या समितीने आपल्या अहवालात महावीर इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीवर निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक बसविल्याचा ठपका ठेवला होता. कंपनीने याव्यतिरिक्त बनावट कागदपत्र बनविणे, जकात चुकवून मुंबईत पेव्हर ब्लॉक आणल्याचे समितीच्या अहवालात म्हटले होते.  जकात चुकवेगिरीबद्दल दोन लाख रुपये दंड आणि बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची शिफारस समितीने केली होती. हा अहवाल हाती पडताच पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी या कंपनीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश शुक्रवारी दिले होते. परंतु एक आठवडा झाला तरी पालिका अधिकाऱ्यांनी या कंपनीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केलेला नाही. आयुक्तांचा आदेश धुडकावून पालिका अधिकारी कंपनीला पाठिशी घालत आहेत, असा आरोप मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी केला आहे.