मुंबई : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इग्नू) मुंबई प्रादेशिक केंद्राचा ३९ वा दीक्षांत समारंभ मंगळवारी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील राजीव गांधी सेंटरच्या केम सभागृहात पार पडला. यावेळी पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये २ हजार ८८७ पदव्या प्रदान करण्यात आल्या. विशेष अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते, तसेच मुंबई प्रादेशिक केंद्राचे प्रादेशिक संचालक डॉ. राहुल मिश्रा यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.

प्रादेशिक संचालक डॉ. राहुल मिश्रा यांनी सर्व पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, इग्नूने केवळ देशाच्या दुर्गम आणि वंचित भागांमध्येच शिक्षण पोहोचवले नाही, तर डिजिटल माध्यमांद्वारे शिक्षण अधिक सुलभ केले आहे. नवीन शिक्षण धोरणात कौशल्य-आधारित शिक्षणावर विशेष भर देण्यात आला असून, त्यामध्ये इग्नू महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मुंबई प्रादेशिक केंद्रातील बीए ऑनर्स (हिंदी) या अभ्यासक्रमातील एका विद्यार्थ्याला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. हा सन्मान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या मैदान गढी येथील मुख्यालयात प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे विद्यापीठाच्या मुख्यालयातून थेट प्रक्षेपण करण्यात आले. सध्याचे युग हे ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे, जिथे केवळ पदव्या नव्हे, तर व्यावहारिक कौशल्ये ही यशाची गुरुकिल्ली आहेत. प्रमुख पाहुणे प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना नवोन्मेष, संशोधन आणि उद्योजकता यांचा पाठपुरावा करण्याचा, तसेच आजीवन शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. प्रा. कुलकर्णी यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या प्रादेशिक केंद्राची प्रशंसा करताना सांगितले की, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचवण्यात इग्नू अग्रगण्य भूमिका बजावत आहे. त्यांनी विशेषतः इग्नूद्वारे नोकरदार, गृहिणी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या संधींची प्रशंसा केली.

या दीक्षांत समारंभाला प्रादेशिक केंद्रातील विविध विद्यार्थी सहाय्य केंद्रांचे समन्वयक व सह-समन्वयक, तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. प्रादेशिक केंद्राचे सहायक प्रादेशिक संचालक डॉ. पी. नंबुद्रीपाद यांनी स्वागतपर भाषण केले, तर डॉ. मिलिंद पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. सुमारे शंभर विद्यार्थी त्यांच्या कुटुंबीयांसह उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.