मुंबई : देशातील व्यवस्थापन शिक्षणासाठी अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. मुंबई (आयआयएम, मुंबई) या संस्थेमध्ये आता क्रीडा व्यवस्थापनाचे धडेही गिरवले जाणार आहेत. आयआयएम, मुंबईने इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट (आयआयएसएम) यांच्या सहकार्याने क्रीडा व्यवस्थापनातील एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. व्यवस्थापन आणि क्रीडा या दोन वेगवेगळ्या क्षेत्रांचा संगम घडवून विद्यार्थ्यांना नव्या करिअरच्या संधी उपलब्ध करून देणे हा या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
भारतात क्रीडाक्षेत्र झपाट्याने व्यावसायिक होत असताना प्रशिक्षित क्रीडा व्यवस्थापकांची गरज वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर हा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. तळागाळातील क्रीडा विकासापासून ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास अधिक सक्षम, संघटित आणि व्यावसायिक पद्धतीने घडवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. क्रीडा संघटन, स्पर्धा व्यवस्थापन, क्रीडा विपणन, प्रसारमाध्यमांची हाताळणी, खेळाडूंचे संगोपन, आरोग्य व फिटनेस व्यवस्थापन आणि क्रीडा धोरण आदी विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश असणार आहे. क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
या अभ्यासक्रमाचे उद्घाटन बीसीसीआयचे माजी प्रशासकीय अधिकारी प्रा. रत्नाकर शेट्टी आणि डब्ल्यूपीपीचे क्रीडा मीडिया प्रमुख विनित कर्णिक यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी क्रीडा क्षेत्रातील संधी, आव्हाने आणि भारताची आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रातील भूमिका यावर सखोल चर्चा करण्यात आली.
भारतात खेळांविषयी प्रचंड आवड असली तरी त्याला व्यावसायिक व्यवस्थापनाची जोड मिळणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमातून भविष्यातील आयोजक, व्यवस्थापक आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानकर्त्यांना राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न असल्याचे आयआयएमचे संचालक प्रा. मनोज तिवारी यांनी सांगितले. तसेच क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम नवी संधी ठरणार असून, आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून मिळणारे शिक्षण त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी सक्षम करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
योग्य प्रशिक्षण व व्यवस्थापनामुळे भारताला अधिक ऑलिम्पिक पदके मिळू शकतात, असे प्रा. रौफ इक्बाल यांनी अभ्यासक्रमाची रूपरेषा स्पष्ट करताना सांगितले. भारताकडे कौशल्यांची कमतरता नाही; योग्य रचना आणि नियोजनाची गरज असल्याचे प्रा. विवेक खानझोडे यांनी सांगितले.
क्रीडा हे पूर्वनियोजन आणि तयारीवर आधारित क्षेत्र आहे. अनुभव आणि शिक्षण यांची सांगड घातल्यास अनेक समस्या कमी करता येतील, असे मत आयआयएसएमचे संस्थापक संचालक आणि माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. व्यावहारिक प्रशिक्षण, उद्योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा संगम साधणारी ही पदविका विद्यार्थ्यांसाठी नवे करिअर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
