मुंबई : डिजिटलायझेशनमुळे उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी आयआयएम मुंबईने येत्या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

डिजिटल सायन्स अँड बिझनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, या अभ्यसक्रमासाठी ७० जागा इतकी प्रवेश क्षमता असणार आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया जेईई मुख्य परीक्षेद्वारे होणार आहे. आयआयएम मुंबईचा हा पहिलाच पदवी अभ्यासक्रम असून पुढील तीन ते चार वर्षांमध्ये यामध्ये वाढ करण्याचा विचार आहे.

आयआयएम मुंबईतून विविध विषयांमध्ये एमबीए पूर्ण केलेल्या पहिल्या तुकडीचा दीक्षान्त समारंभ शनिवारी संस्थेच्या आवारात पार पडला. या समारंभासाठी राष्ट्रीय शेअर बाजाराचे (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) एमडी व सीईओ आशीषकुमार चौहान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज तिवारी यांनी या नव्या शैक्षणिक पदवी अभ्यासक्रमाबद्दलची घोषणा केली.

सध्या देशात शिक्षणापासून शेतीपर्यंत प्रत्येक गोष्टीत डिजिटल क्रांती होत आहे. पण ही डिजिटल क्रांती घडवत असताना ती हाताळणारे सक्षम हात असणे आवश्यक आहे. त्यासाठी डिजिटल सायन्स आणि त्याचसोबत व्यवसाय कौशल्ये यांची जोड असल्यास अनेक क्षेत्रांमध्ये अशा मनुष्यबळाला पुढील काळात प्रचंड मागणी असेल. हा विचार करूनच आम्ही डिजिटल सायन्स अँड बिझनेस मॅनेजमेंटचा पदवी अभ्यासक्रम घेऊन येत आहोत, असे प्रा. तिवारी यांनी सांगितले.

कसे हाेणार प्रवेश

या अभ्यासक्रमासाठी एचपीईसह इतर अनेक कंपन्यांशी सामंजस्य करार झाला आहे. तसेच शिक्षणाच्या सुविधांसाठी आयआयटी मुंबईसोबतही करार दृष्टिपथात आहे. चार वर्षांचा हा पदवी अभ्यासक्रम नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी संलग्न असेल. या अभ्यासक्रमासाठी ७० जागा असतील. या जागा अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई मुख्य परीक्षेच्या निकालानुसार भरल्या जातील.

विशेष म्हणजे या परीक्षेत मिळालेल्या गुणांशिवाय उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीला ३० गुण आणि जेईईच्या गुणांना ७० गुण असे प्राधान्य असेल, असेही प्रा. तिवारी यांनी स्पष्ट केले. या चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमाचे प्रत्येक वर्षाचे शुल्क अंदाजे ६ ते ७ लाख रुपये एवढे असेल.

एमबीएसाठी थेट प्रवेश

चार वर्षांच्या या अभ्यासक्रमानंतर ज्या विद्यार्थ्यांना पाचवे वर्ष शिकून एमबीए ही पदवी घ्यायची असेल, त्यांना तशी मुभा देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी पहिल्या तीन वर्षांत प्रत्येक सत्रात ८ एवढा सीजीपीए राखणे आवश्यक असेल. अशा विद्यार्थ्यांना साडेतीन वर्षांनंतर म्हणजेच ७ सत्रांनंतरच एमबीए हा दीड वर्षांचा अभ्यासक्रम करता येणार आहे. त्यामुळे पाच वर्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या या अभ्यासक्रमाबरोबरच एमबीएचा अभ्यासक्रमही पूर्ण होणार आहे.

५०५ विद्यार्थ्यांना पदवी

आयआयएम मुंबईच्या ५०५ विद्यार्थ्यांना शनिवारी झालेल्या दीक्षान्त समारंभात पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. यात ३०० विद्यार्थी सर्वसाधारण एमबीए अभ्यासक्रमांचे होते. त्याशिवाय १७७ विद्यार्थ्यांनी ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट या विषयात, २८ विद्यार्थ्यांनी सस्टेनेबिलिटी मॅनेजमेंट विषयात पदवी संपादन केली.

आयआयएम मुंबईने एक्झिक्युटिव्ह्जसाठी एक वर्षांचा पदव्युत्तर कार्यक्रम सुरू केले होते. त्यापैकी लॉजिस्टिक्स अँड ऑपरेशन्ससाठी ३९ विद्यार्थी आणि इतर कार्यक्रमांसाठी २६ विद्यार्थी यांनाही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डॉक्टोरल डिग्री मिळालेल्या सात जणांचा सन्मान करण्यात आला.