मुंबई : आयआयएम मुंबईमध्ये २०२४ – २०२६ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या प्लेसमेंटमध्ये ५०५ पैकी ५०२ विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळाल्या. एमबीए, एमबीए – ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट (ओएससीएम) आणि एमबीए – सस्टेनेबिलिटी मॅनेजमेंट या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नाेकऱ्या उपलब्ध झाल्या. तीन विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्यासाठी प्लेसमेंट प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

आयआयएम मुंबईमध्ये महिनाभर चालेल्या प्लेसमेंटमध्ये २०० हून अधिक नामवंत कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या कंपन्यांनी ५०२ विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या. यामध्ये ७१ लाख ४० हजार रुपये सर्वाधिक वार्षिक पॅकेज देण्यात आले. अव्वल १० टक्के विद्यार्थ्यांचे सरासरी पॅकेज ४७ लाख ५० हजार रुपये, त्यानंतरच्या अव्वल २० टक्के विद्यार्थ्यांचे वार्षिक पॅकेज ४१ लाख ४० हजार रुपये, तर अव्वल ५० टक्के विद्यार्थ्यांचे ३४ लाख ५० हजार रुपये इतके नोंदले गेले. यावरून गुणवंत विद्यार्थ्यांची उद्योगक्षेत्रातील मागणी अधोरेखीत झाली आहे.

कन्सल्टिंग हे सर्वाधिक भरती करणारे क्षेत्र ठरले असून १२३ नोकरीच्या संधी या क्षेत्रातून देण्यात आल्या. बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स (बीएफएसआय) क्षेत्रात ३३ टक्के वाढ नोंदवण्यात आली. मुंबईतील वित्तीय संस्थांमध्ये आयआयएम मुंबईच्या पदवीधरांना वाढती पसंती मिळत असल्याचे यावरून स्पष्ट होते. एफएमसीजी क्षेत्रात २४ टक्के वाढ झाली, तर लॉजिस्टिक्स व ऑपरेशन्समध्येही लक्षणीय वाढ झाली. विद्यार्थ्यांना कन्सल्टिंग, आयटी, जनरल मॅनेजमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, फार्मा व हेल्थकेअर, प्रोडक्ट मॅनेजमेंट, सेल्स अँड मार्केटिंग अशा विविध क्षेत्रांत संधी मिळाल्या.

दिग्गज आणि नव्या कंपन्यांचा उत्स्फूर्त सहभाग

आयआयएम मुंबईच्या या हंगामात गोल्डमॅन सॅच्स, जे. पी. मॉर्गन चेस, पेप्सिको, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझाॅन, हिंदुस्तान लिव्हर, आयटीसी लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस यांसारख्या कंपन्याबरोबरच एक्विटास इन्व्हेस्टमेंट्स, नोमुरा, पॉलिसी बाजार, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, अरविंद फॅशन्स, डॉ. लाल पॅथलॅब्स, ग्रुपो बिम्बो, एचसीएल सॉफ्टवेअर आदी नव्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

मागील काही वर्षापासून उद्योग व्यवस्थापन क्षेत्रामध्ये बीएफएसआय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याला मागणी वाढत आहे. बीएफएसआयमधील नोकरीच्या संख्येमध्ये ३३ टक्के वाढ होणे हे स्थानिक नोकरीच्या दृष्टीने फायदेशीर असल्याची माहिती आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी यांनी दिली.