मुंबई : विज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या व आयसरमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘आयएटी २०२६’ या अभियोग्यता चाचणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ एप्रिलपर्यंत आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची देशभरातील विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी तातडीने नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आयएटी ही राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा घेतली जाते. देशभरातील सात आयसर संस्थांमध्ये बीएस-एमएस दुहेरी पदवी तसेच चार वर्षांच्या बीएस अभ्यासक्रमांसाठी या परीक्षेद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. पुणे, भोपाळ, कोलकाता, मोहाली, तिरुवनंतपुरम, तिरुपती आणि बेरहामपूर येथील आयसर संस्थांचा यात समावेश आहे. यंदा या प्रवेश प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, आयएटीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. काही निवडक पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी आयआयटी, आयआयएससी, आयएसीएस आणि आयआयईएसटी शिबपूर यांसारख्या नामांकित संस्थांमध्येही ही परीक्षा ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच परीक्षेद्वारे अधिक व्यापक शैक्षणिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

अभ्यासक्रमांच्या विविधतेमुळे विद्यार्थ्यांना शुद्ध विज्ञानाबरोबरच डेटा सायन्स, अर्थशास्त्र, पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांतही करिअरची संधी मिळणार आहे. संशोधनाभिमुख शिक्षण, प्रयोगशाळेतील कामाचा प्रत्यक्ष अनुभव आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन ही आयसरची वैशिष्ट्ये मानली जातात.

आयएटी २०२६ ही परीक्षा ७ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत संगणकाधारित पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेत जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र या चार विषयांमधून प्रत्येकी १५ प्रश्न विचारले जाणार असून, एकूण ६० प्रश्नांसाठी १८० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ४ गुण, तर चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाणार आहे. अर्ज प्रक्रियेत १६ ते १८ एप्रिलदरम्यान दुरुस्तीची संधी दिली जाणार असून, २४ मे रोजी प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना सर्व माहिती अचूक देण्याची खबरदारी घ्यावी, कारण अर्ज सादर केल्यानंतर काही तपशील बदलता येणार नाहीत.

दरम्यान, प्रवेश प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना सहाय्य करण्यासाठी हेल्पडेस्कही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ७२०५४५७४६१ वर संपर्क साधता येणार असून, तसेच ईमेलद्वारे askjac2026@iiserbpr.ac.in यावरही संपर्क साधता येणार आहे.