लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणानंतर आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी त्यांना २४ तास मानसिक आरोग्य सहाय्य यंत्रणा सुरू केली आहे. या यंत्रणेद्वारे विद्यार्थ्यांना तणावाच्या काळात तातडीने मदत, त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जावी आणि संस्थेच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा, यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य सहाय्य तातडीने मिळावे यासाठी दोन मानसोपचारतज्ज्ञ चोवीस तास उपलब्ध करून देण्यासह, स्वतंत्र कल्याण अनुप्रयोग आणि तक्रार निवारण पोर्टल विकसित करण्याचे नियोजन संस्थेने केले आहे.

साहिलच्या मृत्यूशी संबंधित परिस्थितीची स्वतंत्र चौकशी सुरू असून, विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य सहाय्य मिळावे यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची आयआयटी मुंबईने पुनर्नियोजित परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांना ई-मेल पाठवून ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना मानसिक तणावाच्या काळात तातडीने मदत मिळावी, यासाठी संस्थेने ‘आरोग्य आणि कल्याण प्रतिसाद पथक’ सुरू केले आहे. या पथकामध्ये समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञांचा समावेश असून, दोन मानसोपचारतज्ज्ञ २४ तास उपलब्ध असतील. आपत्कालिन परिस्थितीत मदतीची गरज असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पथक कॅम्पसमधील कोणत्याही ठिकाणी पोहोचणार आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित निर्णयप्रक्रिया अधिक पारदर्शक आणि न्याय्य करण्यासाठी विभागीय शैक्षणिक समितीच्या (डीएसी) कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. या समितीशी संबंधित इतर समित्या आणि परीक्षांमधील गैरप्रकारांच्या प्रकरणांसाठी लागू असलेल्या प्रमाणित कार्यप्रणालींचाही आढावा घेण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येत आहे. संबंधित प्रक्रियांमध्ये निष्पक्षता आणि योग्य कार्यपद्धती सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मदतीसाठी संपर्क क्रमांक

स्वतः मानसिक तणावात असलेले विद्यार्थी किंवा आपल्या मित्राची काळजी वाटणारे विद्यार्थी ८३५६८१०२५२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच wellness@iitb.ac.in या ई-मेलवरही संपर्क साधण्याची सुविधा देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत ई-मेल करण्याऐवजी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तक्रार निवारणासाठी स्वतंत्र पोर्टल

विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी ॲप विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय, वसतिगृह आणि विभागीय स्तरावर विद्यार्थी कल्याण प्रतिनिधी नियुक्त करण्याची योजना आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या आणि तक्रारी मांडता याव्यात, यासाठी स्वतंत्र विद्यार्थी तक्रार पोर्टलही तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रात्रीच्या वेळी वस्तूंच्या वितरणाची सुविधा पहाटे दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. तसेच, वसतिगृहांमधील सामायिक वापराच्या जागा आणि बाहेरील सुविधांचाही आढावा घेतला जात आहे.