मुंबई : आयआयटी मुंबईतून ऑगस्ट २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा ६४ व्या वसंत सत्रातील दीक्षांत समारंभ सोहळा नुकताच पार पडला. या समारंभात एकूण ४३० पदव्या प्रदान करण्यात आल्या. आयआयटी मुंबईच्या या ६४ व्या वसंत सत्रातील दीक्षांत सोहळ्यात एकूण ४३० पदव्या प्रदान करण्यात आल्या. त्यामध्ये २६९ पीएचडी पदव्यांचा समावेश होता. यात एमटेक / एमएस्सी / एमफिल

पीएचडी अशा दुहेरी पदव्यांचाही समावेश आहे. याशिवाय विविध शैक्षणिक कार्यक्रमांतील १६१ पदव्या प्रदान करण्यात आल्या, ज्यामध्ये ४४ एक्झिक्युटिव्ह एमबीए (ई-एमबीए) पदव्यांचा समावेश आहे. वसंत सत्रातील हा दीक्षांत समारंभ यापूर्वी ‘इंटरिम सेशन ऑफ द कॉन्व्होकेशन’ म्हणून ओळखला जात होता. मुख्य दीक्षांत समारंभापूर्वी शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याच्या या पद्धतीमुळे त्यांना करिअर संधी किंवा पुढील शिक्षणासाठी विलंब होत नाही.

समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मोतीलाल ओसवाल फायनाशीयल सर्व्हिस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह – संस्थापक मोतीलाल ओसवाल उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्षस्थान आयआयटी मुंबईच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे कार्यवाह अध्यक्ष डॉ. शरद कुमार सराफ यांनी भूषविले, तर आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले होते.

“तुम्ही इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या काळात पदवीधर होत आहात, जेव्हा तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष जगाचा चेहरामोहरा बदलत आहेत. स्वतःमध्ये गुंतवणूक करा, जिज्ञासू राहा, नैतिक नेतृत्वाचा अवलंब करा आणि यश म्हणजे करिअर, आरोग्य, नातेसंबंध आणि अंतःशांती यांचा समतोल विकास हे लक्षात ठेवा. माझा जीवनमंत्र आहे – ‘शिका, कमवा आणि समाजाला परत द्या’, असे मोतीलाल ओसवाल यांनी यावेळी सांगितले.

बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन यांचे भाषण कार्यवाह अध्यक्ष डॉ. शरद सराफ यांनी वाचून दाखविले.

“आयआयटी मुंबई विज्ञान, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि उद्योजकतेत जागतिक नेतृत्वासाठी सामूहिक प्रयत्न करत असून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पसंतीचे केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ‘विकसित भारत@२०४७’ या दृष्टिकोनात मोलाचे योगदान देण्याची जबाबदारी पदवीधरांवर आहे”, असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय आणि प्राध्यापकांचे अभिनंदन करताना संचालक प्रा. शिरीष केदारे म्हणाले, “आमचे पदवीधर केवळ भक्कम तांत्रिक पायाभूत ज्ञानाने सज्ज नाहीत, तर चिकित्सक विचार, नवोन्मेष आणि जबाबदार नेतृत्वाची क्षमता त्यांच्यात आहे.”

या समारंभास वॉशिंग्टन विद्यापीठातील ग्रॅज्युएट एज्युकेशन अँड इंटरनॅशनल अफेयर्सचे वरिष्ठ उपप्रोव्होस्ट प्रा. विजय रमणी उपस्थित होते. तसेच पदवीधर विद्यार्थी, प्राध्यापक, कुटुंबीय आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.