मुंबई : हवामान बदलामुळे पूरस्थिती अधिक तीव्र होत असताना नैसर्गिक आपत्तींचा अचूक अंदाज येण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथील संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित अत्याधुनिक प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली पावसाळ्यात पूरस्थितीचा फटका बसणाऱ्या भागांतील पुलांवर किती पाणी साचेल, कोणते रस्ते जलमय होतील आणि कोणत्या भागात किती खोलीपर्यंत पाणी साचण्याची शक्यता आहे, याचा अचूक अंदाज वर्तवते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन, नागरी नियोजन आणि बचाव कार्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
आयटआयटीचे संशोधक डॉ. काशिश साधवानी आणि प्रा. टी. आय. एल्धो यांच्या पथकाने द्विस्तरीय मशीन लर्निंग प्रणाली उपग्रहावरील ”सिंथेटिक ॲपर्चर रडार” प्रतिमा आणि जमिनीच्या समुद्रसपाटीपासूनच्या उंचीचा डेटा वापरून कार्य करते. दक्षिण भारतातील पश्चिम घाट परिसरातील सुमारे ५५ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात ३० मीटर रिझोल्यूशनवर पुराचा धोका आणि पाण्याची संभाव्य खोली दर्शविणारे नकाशे तयार करण्याची क्षमता या प्रणालीत आहे. या प्रणालीने पुराचा धोका असलेल्या भागांची ओळख सुमारे ९३ टक्के अचूकतेने केली आहे. विशेष म्हणजे, पारंपरिक पद्धतीप्रमाणे केवळ पर्जन्यमानावर अवलंबून न राहता जमिनीवरील पाण्याचा प्रवाह, मातीतील ओलावा, भूभागाचा वापर, पाणी शोषण्याची क्षमता आणि निचऱ्याची व्यवस्था अशा विविध घटकांचा एकत्रित विचार करून ही प्रणाली अधिक वास्तववादी अंदाज देते.
या प्रणालीच्या पहिल्या टप्प्यात ”क्लासिफिकेशन” मॉडेलद्वारे संबंधित भागात पूर येण्याची शक्यता आहे की नाही, हे निश्चित केले जाते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ”रिग्रेशन” मॉडेल संभाव्य पाण्याची खोली किती असेल, याचा अंदाज व्यक्त करते. त्यामुळे पूरग्रस्त क्षेत्रांचे सलग आणि उच्च दर्जाचे नकाशे तयार होतात. यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीच्या ”सेंटिनेल-१” उपग्रहाच्या एसएआर प्रतिमांचा वापर करण्यात आला आहे. हे रडार दाट ढगांमधूनही जमिनीचा अचूक वेध घेऊ शकते, असे संशोधक डॉ. काशिश साधवानी यांनी सांगितले.
संशोधकांनी विकसित केलेली प्रणाली स्थानिक प्रशासनाला कोणते रुग्णालय, शाळा, रस्ते किंवा इतर महत्त्वाच्या सुविधा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, याचा वेगाने अंदाज घेण्यास मदत करेल. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत संसाधनांचे नियोजन, मदत पथके, नागरिकांचे स्थलांतर आणि मदतकार्य अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. ही प्रणाली सध्या सात टक्क्यांपेक्षा कमी उतार असलेल्या भूभागासाठी विकसित करण्यात आली आहे. सध्या या प्रणालीचा अभ्यास दक्षिण भारतातील पश्चिम किनारपट्टीवर केंद्रित असला, तरी भविष्यात मुंबईसारख्या मोठ्या महानगरांसाठी तसेच पूर्व किनारपट्टीवरील प्रदेशांसाठीही ही प्रणाली वापरता येईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्यासाठी स्थानिक भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचा विचार करून प्रणालीत अनुषंगिक बदल करावे लागतील.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे संशोधन
हवामान बदलामुळे अतिवृष्टी आणि पूराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना ही एआय प्रणाली केवळ हवामानाचा अंदाज देणारे तंत्रज्ञान नसून आपत्तीपूर्व तयारी, जोखीम व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी निर्णय घेण्याचे साधन ठरू शकते. यामुळे पूरामुळे होणारे नुकसान कमी करण्यास आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यास मदत होईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.
