मुंबई : मुंबई महानगरातील रेल्वेचा कायापालट करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि भारतीय प्रौद्योगिक संस्थान (आयआयटी) मुंबई एकत्र आले आहेत. वातानुकूलित लोकल सेवा, त्यांचे तिकीट दर, रेल्वेच्या वाढीव फेऱ्या, लोकलचा वक्तशीरपणा, प्रकल्पांचा आढावा, आर्थिक आणि व्यावसायिक शाश्वततेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई महानगरातील रेल्वे सेवा शहरी प्रवासासाठी जीवनवाहिनी आहे. रेल्वे सेवा सर्वाधिक प्रवासी सेवा आणि सर्वाधिक किमीपर्यंत सेवा देते. सध्या मेट्रो रेल्वे जाळे विस्तारत असले तरी लोकल सेवा ही किफायतशीर आणि शहराच्या वाहतुकीचा कणा आहे. एमआरव्हीसी आणि आयआयटी मुंबई यांच्यात जानेवारी २०२५ मध्ये २.५ वर्षांच्या संयुक्त अभ्यासासाठी करार करण्यात आला आहे. या अभ्यासात मुंबई महानगर प्रदेशातील उपनगरी रेल्वे संचालनाचा पुढील दहा वर्षांचा विचार करून सखोल आढावा घेतला जाणार आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे सेवा, मेट्रो, बेस्ट बस, एमएमआरडीए आणि महानगरपालिका यांच्या समन्वयाने अभ्यास केला जाईल.
रेल्वेची वित्तीय शाश्वतता, भविष्यातील पायाभूत सुविधा गुंतवणूक, वाहतूक नियोजन आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा याबाबत आयआयटी मुंबई धोरणात्मक शिफारसी करणार आहे. या प्रकल्पासाठी प्रवासी, तज्ज्ञ आणि विविध भागधारकांकडून सूचना मागवण्यात येत असून, भविष्यात महामुंबईतील वाहतूक व्यवस्थेत उपनगरी रेल्वेची भूमिका कशी असावी, याबाबत सर्वांची मते जाणून घेतली जातील. आयआयटी मुंबईचा अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर लोकल सेवा विस्ताराबाबत, वातानुकूलित लोकलच्या तिकिट दरांसह इतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची चिन्हे आहेत.
वातानुकूलित लोकलचे तिकीट कमी करण्यास प्रयत्नशील
येत्या काही वर्षात सामान्य लोकलऐवजी टप्प्याटप्प्याने वातानुकूलित लोकल चालवण्यात येईल. या वातानुकूलित लोकलचे तिकीट दर, वेळापत्रक आणि सेवा विस्ताराचा आराखडा आयआयटी बॉम्बेच्या अभ्यासातून निश्चित केला जाणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि आयआयटी मुंबई यांच्याद्वारे वातानुकूलित लोकलचे तिकीट परवडण्यासारखे करण्याबाबत अभ्यास केला जाईल.
प्रकल्पाची उद्दिष्ट्ये
– रेल्वेसाठी सेवा नियोजन आणि वितरणाचे मूल्यांकन करणे
– वातानुकूलित लोकलच्या संख्येत वाढ करणे
– रेल्वेची मागणी आणि वेळापत्रकाचे विश्लेषण करणे
– आर्थिक आणि व्यावसायिक शाश्वततेचा अभ्यास करणे
– मध्य आणि पश्चिम रेल्वे, बेस्ट, एमएमआरडीए, मेट्रो आणि महानगरपालिकांसारख्या संस्थांसोबत समन्वय राखणे
या अभ्यासाचा मुख्य केंद्रबिंदू वातानुकूलित लोकल सेवांचा विस्तार असणार आहे. वातानुकूलित लोकलमुळे प्रवाशांच्या प्रवासाच्या दर्जात्मक सुधारणा होईल. यासह तिकीट दर, वेळापत्रकाचे नियोजन, लोकल सेवांची उपलब्धता, देखभाल व्यवस्था, तांत्रिक अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची प्रक्रिया यासारखी आव्हाने आहेत.

