तुटवडय़ावर मात करण्यासाठी यंत्र

मुंबई : करोना साथीच्या काळात देशभरात प्राणवायूची मोठय़ा प्रमाणात कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णाला बाहेरून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय प्राणवायूचा पुरेपुर वापर करून तो वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘रिब्रिदर’ नावाचे नवे यंत्र आयआयटी मुंबईने विकसित केले आहे. सध्या रुग्णालयात असलेल्या रचनेमध्येच काही तांत्रिक बदल करून हे यंत्र बसविणे शक्य आहे.

करोना संसर्गामुळे थेट फुप्फुसावर परिणाम होत असल्याने या रुग्णांना मोठय़ा प्रमाणात कृत्रिम पद्धतीने प्राणवायू द्यावा लागतो. यामुळे देशभरातील वैद्यकीय प्राणवायूची मागणी वाढल्याने मोठा तुटवडा भासत आहे. तेव्हा यातून तोडगा काढण्यासाठी रुग्णाला लावलेल्या प्राणवायूची बचत कशी करता येईल या उद्देशाने आयआयटीने हे यंत्र तयार केले आहे.

सर्वसाधारण स्थितीमध्ये रुग्णाला प्राणवायू देण्यासाठी असलेल्या रचनेमध्ये तोंडाला लावायचा मास्क हा थेट प्राणवायूचे सिलेंडर किंवा पाईप गॅसला जोडलेला असतो. यामध्ये प्राणवायूचा दाब निश्चित करून रुग्णाच्या आवश्यकतेनुसार पुरविला जातो. श्वास आत घेण्याच्या प्रक्रियेमध्ये हा प्राणवायू तोंडाला लावलेल्या मास्कमधून शरीरात घेतला जातो. उच्छवास सोडताना कार्बनडाय ऑक्साईडसह अन्य काही वायू बाहेर सोडले जातात. सर्वसाधारण व्यक्ती श्वास घेताना प्रतिमिनिट पाच लीटर प्राणवायू घेतो. प्यातील प्रतिमिनिट एक लीटर प्राणवायू शरीरात वापरला जातो. उर्वरित पुन्हा बाहेर पडतो. त्यामुळे सुमारे ०.२५ टक्के प्रतिमिनिट प्राणवायूचा प्रत्यक्षात वापर केला जातो. गंभीर प्रकृती असलेला करोनाबाधित रुग्ण प्रतिमिनिट ५० लीटर प्राणवायू श्वासाद्वारे घेतो. परंतु यातील प्रतिमिनिट जवळपास १ लीटर प्राणवायू प्रत्यक्ष शरीरात जातो आणि ४९ लीटर पुन्हा मास्कमध्येच राहतो आणि बाहेरील हवेत पसरतो. तेव्हा हा वाया जाणारा प्राणवायू पुन्हा वापरण्यासाठी हे यंत्र तयार केले आहे. यात मास्कला जोडलेल्या एका नळीद्वारे मास्कमधील हवेचे प्राणवायू आणि कार्बनडाय ऑक्साईडमध्ये वर्गीकरण केले जाते. यातील प्राणवायू पुन्हा शरीराला पुरविला जातो. यामुळे प्रत्येक श्वासाद्वारे वाया जाणाऱ्या प्राणवायूचा पुनवार्पर केला जात असल्याने जवळपास १०० टक्के प्राणवायूचा वापर केला जातो. हे यंत्र आयआयटीशी जोडलेल्या टाटा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अण्ड डिझाईन, केमिकल इंजिनिअरिंग आणि नेक्स रोबॉटिक्स या आयआयटीचे माजी विदयार्थी, सध्याचे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी विकसित केले आहे.

सध्या रुग्णालयात प्राणवायूच्या अभावी होणारे मृत्यू, प्राणवायू गळतीमुळे होणाऱ्या आगीच्या घटना इत्यादी टाळण्यासाठी हा पर्याय अधिक सुरक्षित असून याचा वापर करणेही सोपे आहे.

रुग्णालयात उपलब्ध यंत्रणेमध्येच काही तांत्रिक बदल करून हे यंत्र बसविणे शक्य आहे. यासाठी सुमारे दहा हजार रुपये खर्च आहे. मोठय़ा प्रमाणात याची निर्मिती केल्यास खर्चही कमी होऊ शकेल. तेव्हा हे तंत्रज्ञान अवलंबून त्याचा वापर करण्याचे आवाहन आयआयटीने केले आहे. हे यंत्र रुग्णालयात तयार करण्यासाठी आवश्यक ती मदत ही करण्यास आयआयटी तयार आहे.

या यंत्रात वापरलेले तंत्रज्ञान नवे नाही. गिर्यारोहक अतिउंचीवर चढतात तेव्हा प्राणवायूचा वापर काटकसरीने करण्यासाठी हेच तंत्रज्ञान वापरले जाते. प्राणवायूच्या तुटवडय़ावर काही मार्ग काढता येईल का असा प्रश्न आम्हाला अनेकांकडून विचारला जात होता. त्यामुळे यावर अधिक खोलात विचार केल्यावर रुग्णाला पुरविलेल्या प्राणवायूपैकी बहुतांश वाया जात असल्याचे लक्षात आले. यातूनच हे यंत्र तयार केले गेले. या यंत्राची चाचणी आयआयटीच्या रुग्णालयात केली आहे. परंतु वैद्यकीय चाचणी अद्याप केलेली नाही. वैद्यकीय चाचणीला बराच कालावधी लागतो. परंतु आता याची तातडीने गरज असल्यामुळे आम्ही यंत्र बनविण्याचे तंत्रज्ञान सर्वासाठी खुले केले आहे.

– प्रा. संतोष नरोन्हा , टाटा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अण्ड डिझाईनचे प्रभारी