मुंबई : नाविन्यपूर्ण कल्पना असूनही आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी नवउद्योजकांची स्वप्ने अपुरी राहतात. ही दरी भरून काढण्यासाठी आयआयटी मुंबई आणि ग्रो फाउंडेशन यांनी ‘आयआयटीबी-ग्रो इन्व्हेंट’ उपक्रम सुरू केला आहे. पहिल्याच वर्षी आयआयटी मुंबईतील ३५ विद्यार्थ्यांच्या १९ नाविन्यपूर्ण प्रकल्पांची निवड करण्यात आली असून, त्यांना अर्थसहाय्य, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि अत्याधुनिक इनोव्हेशन स्पेस उपलब्ध करून दिली जाणार आहे. पुढील चार वर्षांत या उपक्रमावर सुमारे २२ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

देसाई सेठी स्कूल ऑफ आंत्रप्रेन्युअरशिप आणि ग्रो फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी विविध शाखांमधून सुमारे ४०० प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यातून १९ प्रकल्पांची निवड करण्यात आली. धारावीतील कुंभारांसाठी डिजिटल विक्री मंच, फिजिओथेरपी रुग्णांसाठी स्मार्ट परिधान उपकरण, कार्बन डायऑक्साइडपासून खाद्य प्रथिने तयार करण्याचे तंत्रज्ञान, तसेच संवेदनशील पायाभूत सुविधांचे ‘रोग’ ड्रोनपासून संरक्षण करणारी कृत्रिम प्रज्ञा (एआय) प्रणाली अशा विविध संकल्पनांचा त्यात समावेश आहे.

तीन विद्यार्थी संघांची ‘ग्रँड चॅलेंज फेलो’ म्हणून निवड झाली असून, त्यांना प्रगतीनुसार दरवर्षी प्रत्येकी २५ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य मिळणार आहे. उर्वरित १६ संघांना ‘प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट’ टप्प्यासाठी प्रत्येकी ३० हजार रुपयांचे प्रारंभिक अनुदान दिले जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबईतील १५ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या ‘ग्रो इनोव्हेशन स्पेस’मध्ये प्रोटोटाइप विकसित करण्याची सुविधा मिळणार आहे. दरवर्षी १०० हून अधिक विद्यार्थी संघांना या कार्यक्रमातून प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमातून दरवर्षी १०० हून अधिक विद्यार्थी संघांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील कल्पनांचे कार्यक्षम प्रोटोटाइप आणि त्यानंतर बाजारपेठेसाठी सज्ज उत्पादनामध्ये रूपांतर करण्यावर या उपक्रमाचा भर असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर उद्योग क्षेत्राशी संपर्क, अनुभवी मार्गदर्शकांचे सहकार्य आणि प्रत्यक्ष उद्योजकतेकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक परिसंस्थाही उपलब्ध होणार आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.