मुंबई : देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रात वेगाने बदल होत असताना आयआयटी मुंबईने अणुऊर्जा क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी न्यूक्लिअर इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्याने निधी उपलब्ध केला आहे. हा अभ्यासक्रम ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी हबच्या माध्यमातून राबवला जाणार आहे.

शांती कायदा २०२५ नंतर अणुऊर्जा क्षेत्रात खासगी सहभागाला चालना मिळाली आहे. संशोधन, नवकल्पना आणि तांत्रिक कौशल्य यांची गरजही वाढली आहे. ही गरज लक्षात घेऊनच आयआयटी मुंबईने राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत असा हा अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ वर्गातील शिक्षणापुरता मर्यादित राहणार नाही.

भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात महत्त्वाचे स्थान असलेल्या थोरियम-आधारित तंत्रज्ञानावर विशेष भर दिला जाणार आहे. त्यासाठी यांत्रिकी अभियांत्रिकी, ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी, धातुकर्म व मटेरियल्स सायन्स तसेच विद्युत अभियांत्रिकी विभाग एकत्रितपणे काम करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बहुविषयक संशोधनाची संधी उपलब्ध होणार आहे.

राष्ट्रीय प्रयोगशाळा, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्राशी सहकार्य वाढवत संशोधन आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा संगम घडवून आणण्यावर भर देण्यात येणार असून, संस्थेत अत्याधुनिक न्यूक्लिअर मेजरमेंट लॅबोरेटरी उभारण्यात येणार आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि ऊर्जा स्वावलंबी भारताच्या उद्दिष्टाला हातभार लावणारे संशोधन या माध्यमातून पुढे येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

अलीकडेच आयआयटी मुंबईत झालेल्या इंडिया न्यूक्लिअर एनर्जी फोरम-२०२६ मध्येही अणुऊर्जा क्षेत्रातील पुरवठा साखळी, स्मॉल मॉड्युलर रिऍक्टर्स, मानवी संसाधन विकास आणि नवउद्योजकतेसाठी सक्षम परिसंस्था उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली होती. अणुऊर्जा क्षेत्रातील राष्ट्रीय धोरणातील बदल ही देशासाठी मोठी संधी आहे. या बदलांशी सुसंगत संशोधन, स्वदेशी तंत्रज्ञान विकास आणि तज्ज्ञ मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल. – प्रा. शिरीष केदारे, संचालक, आयआयटी मुंबई</strong>