मुंबई: कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान आणि ई-शासनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईने डिजिटल गव्हर्नन्स विषयातील ई-पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा असून पूर्णपणे ऑनलाईन असेल.
सरकार, उद्योग आणि विविध संस्था वेगाने डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत असताना उदयोन्मुख तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि नियमन यांसंदर्भातील प्रभावी प्रशासन व धोरणांची गरज वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन डिजिटल गव्हर्नन्स, सार्वजनिक धोरणे, तंत्रज्ञान आणि नियामक व्यवस्थापन यांचा समन्वय साधणारे कौशल्य विकसित करण्यासाठी आयआयटी मुंबईने हा अभ्यासक्रम तयार केला आहे.
अभ्यासक्रमाची रचना पूर्णपणे ऑनलाइन आहे. त्यामध्ये थेट संवादात्मक सत्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक नव्हे तर प्रत्यक्ष वापरावर आधारित शिक्षण मिळणार आहे. डिजिटल परिवर्तनाच्या प्रक्रियेत नेतृत्व करणारे व्यावसायिक, सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील अधिकारी, तंत्रज्ञान नियमनाशी संबंधित कायदा, धोरण, संशोधन, शैक्षणिक क्षेत्र आणि सल्लागार क्षेत्रातील व्यावसायिक यांच्यासाठी हा अभ्यासक्रम विशेष उपयुक्त ठरणार आहे.
या अभ्यासक्रमात डिजिटल गव्हर्नन्स फ्रेमवर्क, तंत्रज्ञान धोरणे, सायबर सुरक्षा प्रशासन, डिजिटल प्लॅटफॉर्मचे नियमन, डिजिटल परिवर्तन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच अल्गोरिदमिक प्रणालींच्या युगातील उदयोन्मुख नियामक दृष्टिकोन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी शिक्षण क्षेत्रातील कंपनी सिम्पलीलर्न ही शैक्षणिक भागीदार म्हणून कार्यरत आहे. सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता-केंद्रित युगात डिजिटल परिवर्तन वेगाने होत आहे. त्यामुळे प्रशासनाला कायदेशीर, नैतिक, आर्थिक आणि संस्थात्मक अशा अनेक गुंतागुंतीच्या बाबींचा विचार करावा लागतो.
या आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक विश्लेषणात्मक चौकट आणि प्रशासनविषयक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम काळजीपूर्वक तयार करण्यात आल्याची माहिती आयआयटी मुंबईच्या सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्योरशिप (साईन) या संस्थेच्या गव्हर्निंग बोर्डाचे उपाध्यक्ष अशांक देसाई यांनी दिली.
विविध शैक्षणिक शाखांतील आणि उद्योग क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी हा अभ्यासक्रम खुला आहे. अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबईकडून ई-अलुम्नी दर्जा प्रदान केला जाईल. तसेच त्यांना संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण आणि नेटवर्किंग परिसंस्थेचा लाभही मिळणार आहे. सध्या या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, डिजिटल प्रशासन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.
