पवई येथील आयआयटी-मुंबई परिसरातील रहिवासी आणि विद्यार्थी यांच्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका बिबट्याने श्वानावर हल्ला करून ठार मारल्याचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ही घटना १९ जून रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या धक्कादायक दृश्यांनी सर्वांचे लक्ष वेधले असून, परिसरातील निवासी भागाजवळ बिबट्याचा वावर वाढल्याबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात श्वानाचा मृत्यू
या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक श्वान पायरीजवळ उभा असल्याचे दिसत आहे. श्वानाच्या हालचालींवरून त्याला आसपास धोका जाणवल्याचे स्पष्ट दिसते. काही क्षणांनंतर श्वान ज्या दिशेकडे पाहत आहे, तिथून एक बिबट्या येताना दिसतो आणि थेट श्वानावर हल्ला करतो. श्वान आणि बिबट्यात काही वेळ संघर्षही होतो. ही झटापट काही वेळ चालू असते. काही क्षणातच बिबट्या श्वानाला झुडपांमध्ये ओढत नेत असल्याचे दृश्य दिसते.सुदैवाने या घटनेत कोणत्याही विद्यार्थी, कर्मचारी किंवा रहिवाशाला इजा झालेली नाही. मात्र कॅम्पसमध्ये बिबट्या मुक्तपणे फिरल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पाहा व्हिडीओ
A Leopard Entered IIT Bombay Campus at Staff Hostel and Viciously Attacked a Dog Caught on CCTV Camera? pic.twitter.com/bsfcUvBTXS
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 19, 2026
वनविभाग सतर्क, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
या घटनेची माहिती मिळताच वनविभाग तसेच संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. याचप्रमाणे आयआयटी मुंबई परिसरातील संवेदनशील भागांवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, रहिवासी, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा एकटे फिरण्याचे टाळावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. पाळीव प्राणी आणि भटक्या कुत्र्यांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
नागरिकांमध्ये चितेंचे वातावरण
या घटनेमुळे आयआयटीमधील विद्यार्थी, कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत आता सर्वच बाजूंनी चिंता व्यक्त केली जात आहे. शेजारीच वनपरिक्षेत्र असल्यामुळे पवई आणि आसपासच्या परिसरात यापूर्वीही बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, मानवी वस्तीच्या इतक्या जवळ अशा घटना घडणे अत्यंत चिंताजनक असल्याचे तिथल्या रहिवासींनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला सांगितले आहे.
