शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात बदल व्हायला हवेत, हे सार्वकालिक विधान. ते एकदा मांडले, की बदलांची वाट सुकर होते, असे मानले जाते. प्रत्यक्षात काही बदलते का? तर, ते शाळा-महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या बहुतांशांचा न झालेला कौशल्ये व आकलन विकास आणि परिणामी रोजगारअक्षमता यातून प्रतिबिंबित होतच असते. पण, तरी प्रत्येकच सरकारला बदल करावेसे वाटतात. त्यांचे म्हणणे असते, आम्हीच हे प्रतिबिंब आणि प्रतिमा बदलणार. चांगलेच. कल्पना मांडायला काहीच हरकत नाही. त्यातून किमान बदलांची आशा जिवंत राहते.
हे असे प्रास्ताविक करण्याचे कारण नुकतेच घडले. ते म्हणजे, आयआयटी-मुंबईने यंदापासून मूल्यमापन पद्धतींत बदल करण्याचे केलेले सूतोवाच. चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अध्यापन पद्धतीत बदल झाले, आता आगामी शैक्षणिक वर्षात मूल्यमापनात होतील. शैक्षणिक परिसंस्थेत हे असे एखादे उदाहरण निर्माण होणे अनेक मुद्द्यांची उजळणी करण्याचे निमित्त देते. त्यातून ‘आयआयटी’सारख्या प्रतिष्ठित, आघाडीच्या संस्थेत हे बदल होत असतील, तर त्याचे प्रारूप इतरांसाठी मार्गदर्शक. तेव्हा, ते आधी समजून घेणे आणि वर उल्लेखल्याप्रमाणे आधीच्या मूल्यमापन प्रयोगांची उजळणी करणे औचित्याचे.
आयआयटी-मुंबईतील अध्यापन बदल
गेल्या वर्षी आयआयटी-मुंबईने अध्यापन पद्धतीत बदल केले. उपक्रमाधारित अध्यापनावर भर देणे, हा त्याचा केंद्रबिंदू. उद्देश असा, की केवळ सैद्धान्तिक ज्ञानावर अवलंबून न राहता, त्याचा प्रत्यक्ष वापर करण्याची संधी विद्यार्थ्यांना अध्यापकांनीच उपलब्ध करून द्यावी. प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव ही त्याची पुढची सुसंगत पायरी. त्यासाठी मग माजी विद्यार्थ्यांचे संघटन पुढे आले. त्यांनी हा अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेऊन उमेदवारीच्या संधी निर्माण करण्याबाबत पावले उचलली. हे सगळे शक्य करण्यासाठी अध्यापन-अध्ययन मूल्यमापन समिती निर्माण केली गेली, ज्यात शिक्षक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांचा सहभाग होता. आणखी एक कल्पना राबविण्याचा विचार झाला, तो म्हणजे पहिल्या वर्षाचा पाठ्यक्रम शिकून झालेल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या गावांत जाऊन तेथे स्वयंस्फूर्तीने उमेदवारी करण्याचा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळगावातील एखादा प्रश्न सोडवावा, हा उद्देश. थोडक्यात, कामाचा अनुभव आणि त्याची समाजाशी साखळीजोडणी.
मूल्यमापनातील नावीन्य
अध्यापनातील बदलांचा पुढचा सुसंगत टप्पा मूल्यमापनाचा. विद्यार्थ्यांची कौशल्ये आणि गुण लक्षात घेऊन अध्यापन केले गेले, तर प्रत्येकाचे स्वतंत्र मूल्यमापन करणे शक्य. त्यासाठी आता यंदा पावले उचलली जातील. शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना याची कल्पना दिली गेली, जे आता मूल्यमापनात प्रत्यक्षात येणे अपेक्षित. शिवाय, वेगवेगळ्या विद्याशाखा व विभागांसाठी लागणारी कौशल्ये आणि गुण वेगवेगळे असणार, त्यामुळे त्यांची मूल्यमापन पद्धतीही वेगवेगळी करण्यावर भर. आता प्रश्न इतकाच, की पदवी घेऊन बाहेर पडताना नोकरी भरती प्रक्रियेत या मूल्यमापनाचा कसा उपयोग होणार? त्यासाठी सध्या तरी श्रेणी संरचनेचे महत्त्व कायम राखले जाईल.
बदलांची पूर्वपीठिका
‘आयआयटी’त सुरू झालेला हा प्रयोग काय पथदर्शन करू शकतो, हे समजून घेण्यापूर्वी आतापर्यंत शालेय पातळीवर झालेल्या अध्यापन आणि मूल्यमापन बदलांच्या प्रयोगांचे काय झाले, हे जाणून घेणे आवश्यक. अध्ययन-अध्यापन पद्धतींत शालेय पातळीपासूनच आमूलाग्र बदल करण्याची मागणी, त्यासाठी मांडण्यात आलेल्या कल्पना आणि मग त्यावर आधारित प्रयत्न ही साखळी गेल्या दीड दशकात अखंड सुरू आहे. शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर त्यामध्ये प्राथमिक स्तरावरील अध्यापनात विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर होता. त्यातूनच प्रकल्प करण्यास सांगितले जाऊ लागले. विद्यार्थ्यांनी शिकलेल्या संकल्पनेवर आधारित करावयाचे प्रकल्प प्रत्यक्षात गुणांवर तोलले जाऊ लागल्यावर, त्याला पालकांचा ‘हातभार’ लागायला सुरुवात झाली, जो कायम आहे. मूळ उद्देश हरवतो तो असा. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अर्थात कन्टिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह ईव्हॅल्युएशन – सीसीईची गतही तीच झाली. नववी-दहावी इयत्ता या बोर्डाच्या परीक्षांची तयारी करण्याची प्रयोगशाळा असल्याने मार्कांची चढाओढ वरचढ ठरली. त्यात मग विद्यार्थ्यांची वर्षभराची कामगिरी, प्रकल्पांतील कल्पकता, वर्तन, संकल्पनांचे आकलन, विषयांतील गती, कौशल्यांचा विकास याचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करत करत एकूणच शिक्षण व्यक्तिमत्त्व फुलण्यासाठी पूरक ठरण्याची संधी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी गमावली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांत २०१२-१३ मध्ये सुरू झालेला ‘सीसीई’चा प्रयोग २०१७ मध्ये बंद पडला.
नवीन शिक्षण धोरणाचे आगमन
‘सीसीई’ बंद पडले, तरी ते पुन्हा नव्या स्वरूपात येण्याची चाहूल लागली, ती २०२० चे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाल्यावर. संकल्पना फार वेगळी नाही. विद्यार्थ्यांचा सर्वंकष विकास होण्यासाठी मातृभाषेतील शिक्षणापासून मूल्यमापनातील गुणांचा आग्रह वजा करण्यापर्यंतचे नवे उपाय धोरणाने सांगितले. आयआयटी-मुंबई करत असलेला उपरोल्लेखित प्रयोग यातूनच मार्गदर्शन घेऊन पुढे जाऊ पाहणारा. शालेय शिक्षणातही अध्यापन आणि मूल्यमापनाचे शाळा-वर्ग पातळीवर वैयक्तिक प्रयोग करणारे अनेक शिक्षक आहेत. त्यांचे मार्गदर्शन, कल्पनांची देवाण-घेवाण हा बदलांचा पहिला टप्पा असूच शकतो. एक रोचक उदाहरण. पाऊस समजावून सांगण्यासाठी एका शाळेतील एका शिक्षिकेने आधी पावसाशी संबंधित शब्दांची यादी, मग त्या शब्दांचे वेगवेगळे निकष वापरून वर्गीकरण असे करत करत पाऊस भाषा, भूगोल, विज्ञान आणि इतिहासापर्यंत नेला. पावसाला पत्र, त्याचे आत्मवृत्त, त्यावरील एखाद्या ओळीवरून कविता असे वेगवेगळे प्रयोग झाले आणि पाऊस विद्यार्थ्यांत झिरपला. यातून आलेली पावसाविषयीची समज रुक्ष धडे आणि त्याखालील प्रश्नांची अचूक उत्तरे लिहिल्याने मिळणारे मार्क, यांतून येणार नाही. थोडक्यात, असे प्रयोग करणारे शिक्षक-शिक्षिका अध्यापनातील आणि पर्यायाने मूल्यमापनातील बदलांच्या प्रवासातील महत्त्वाचे सहयात्री असू शकतात. त्यांना तसे सामावून घ्यायला हवे.
आयआयटी प्रयोगाचे पथदर्शन
विद्यार्थ्यांना मार्कांनी निर्माण होणाऱ्या स्पर्धेपासून आणि पर्यायाने घोकंपट्टीपासून दूर नेण्यासाठी मूल्यमापन पद्धतींत बदल करायलाच हवे आहेत. त्यासाठी सर्वांत महत्त्वाचे ठरते, ते शिक्षकांचे प्रशिक्षण. आयआय़टी-मुंबईने तेच आधी केले. तेथे ते बरेच सुकर असणार, कारण ज्या विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे, ते आधीच एक मोठी स्पर्धा पार करून आलेले देशातील उत्तमोत्तम विद्यार्थी आहेत. यामुळे साहजिकच बदलांच्या स्वीकाराचा वेग वाढतो. मात्र, सार्वत्रिक पातळीवरील शालेय शिक्षणातील शिक्षकांचे प्रशिक्षण करताना, ‘आयआयटी’च्या शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा निकष जसाच्या तसा लावता येणार नाही. किंबहुना, या पातळीवर शिकविणाऱ्या शिक्षकांचे असे प्रशिक्षण किंवा सर्वंकष मूल्यमापनासाठी क्षमतावृद्धी करणे, हा तसा जिकिरीचाच उद्देश आहे. पण, शालेय पातळीपासूनच मूल्यमापनात बदल हवे असतील, तर तो हाती घेण्यावाचून पर्यायही नाही. शिक्षकांनीही त्यासाठी स्वीकारशील राहायला हवे, स्वयंस्फूर्तीने प्रयोगशील बनायला हवे.
विद्यार्थी-पालकांची भूमिका
मूल्यमापनातील बदलांची ही प्रक्रिया शालेय पातळीवर साधली, तर विद्यार्थ्यांसाठीही ती अधिक तार्किक असेल. विद्यार्थ्यांना आपले मूल्यमापन आकलनावर, कल जाणून घेण्यावर आणि मिळविलेल्या कौशल्यांच्या आधारावर होणार असल्याचे शालेय पातळीपासूनच पक्के माहीत असेल, तर उच्च शिक्षणाच्या पातळीवर जुळवून घेणे सोपे जाईल. अर्थात, हा बदल पालकांनीही स्वीकारायला हवा. पाल्यांच्या गुणवत्तेचे, अंगभूत कौशल्यांचे मापदंड म्हणजे त्याला परीक्षेत मिळालेले गुण इतका सरधोपट अर्थ लावून आता चालणार नाही. विविध विद्याशाखांतील प्रवेशांसाठी असलेल्या बोर्डांच्या परीक्षांतील किंवा प्रवेश परीक्षांतील गुणांची स्पर्धा याला कारणीभूत असते आणि त्यामुळे मार्कांना महत्त्व कायम राहते, हे मान्यच. पण, तेही कधी तरी बदलावे लागेल. त्यासाठी अशा परीक्षांचे संचलन आणि निकषही नव्याने तयार करावे लागतील. ते आणखी अवघड काम. पण, त्याला गत्यंतर नाही.
अखेर मुद्दा इतकाच, की आयआयटी-मुंबई करू पाहत असलेल्या अध्यापन आणि मूल्यमापनातील प्रयोगाकडे, पूर्ण शिक्षण व्यवस्थेत बदल रुजण्यासाठीची सुरुवात म्हणून पाहिले, तर ‘शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात बदल व्हायला हवेत,’ हे सार्वकालिक विधान फक्त विधानापुरते न राहता कृतिशीलतेत रूपांतरित होईल. आता ती वेळ आली आहे…
siddharth.kelkar@expressindia.com
