मुंबई : आयआयटी मुंबईने देशाची संरक्षण सज्जता, भारतीय पारंपरिक ज्ञान, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्र या चार विभागांमध्ये नवीन पीएचडी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याला आयआयटी मुंबईच्या अधिसभेने मान्यता दिली आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी दिली.

देशाच्या संरक्षण गरजा ओळखून आयआयटीमध्ये ‘सेंटर फॉर डिफेन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन्स अँड स्ट्रॅटेजिज’ची १० महिन्यांपूर्वी स्थापना केली. या केंद्रात संरक्षण तंत्रज्ञान संशोधनासाठी पीएचडी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय डिसेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अधिसभेच्या बैठकीत घेण्यात आला. हे केंद्र केवळ संशोधनावरच नाही, तर देशाच्या संरक्षणासाठी ‘तांत्रिक रणनीती’ तयार करण्याचे काम करेल.

भारतीय संस्कृतीतील प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालण्यासाठी ‘सेंटर फॉर ट्रॅडिशनल इंडियन नॉलेज अँड स्किल्स’ सुरू केले. त्यामध्ये कुंभार, सुतार, लोहार यांसारख्या विविध क्षेत्रांतील कारागिरांच्या कौशल्यांचे शास्त्रीय विश्लेषण करण्यासाठी आणि भारतीय भाषांमधील ज्ञान उलगडण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या मदतीने हा अभ्यासक्रम राबवणार आहोत, असे प्रा. केदारे यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रातील दैनंदिन समस्यांवर तांत्रिक उपाय शोधण्यासाठी ‘मेडिकल टेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन सेंटर’ कार्यरत असून या केंद्रातही पीएचडी सुरू केली जात आहे. यामध्ये विद्यार्थी थेट डॉक्टरांसोबत काम करून आरोग्याशी संबंधित समस्यांवर संशोधनाद्वारे उपाय

शोधणार आहेत. तसेच वित्त क्षेत्रातील वाढती व्याप्ती लक्षात घेऊन ‘मोतीलाल ओसवाल सेंटर फॉर कॅपिटल मार्केट्स’मध्येही पीएचडी कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ संशोधक तयार होण्यास मदत होईल, असेही केदारे यांनी सांगितले.