मुंबई : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूप्रकरणी आयआयटी मुंबईकडून स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले असले तरी अद्याप चौकशी समितीने आपल्याशी संपर्क साधलेला नाही. तसेच समितीने बोलावल्यास आपण बाजू मांडण्यासाठी जाऊ. मात्र, बोलावल्याशिवाय स्वतःहून जाणार नसल्याचे रवींद्र वाकोडे यांनी सोमवारी सांगितले.
शिवाय, दहा दिवसांपासून आझाद मैदानात उपोषण करूनही सरकारकडून ठोस आश्वासन मिळाले नसल्याने प्रा. सूर्यनारायण डुल्ला व आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांना अटक करून चौकशी करावी, या मागणीवर वाकोडे ठाम आहेत. साहिलच्या मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या तपासाला आपले पूर्ण सहकार्य असून, गुन्हे शाखेचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र, संबंधितांना अटक करून त्यानंतरच चौकशी करण्यात यावे, अशी मागणी वाकोडे यांनी आझाद मैदानात पत्रकारांशी संवाद साधताना पुन्हा बोलून दाखविली.
तपासाचा भाग असलेले चित्रीकरण बाहेर कसे आले, ते कोणी बाहेर आणले व ते जाणीवपूर्वक बाहेर आणले गेले का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, चित्रीकरण नेमके कोठून बाहेर आले, याबाबत आपण कोणताही निष्कर्ष काढणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. साहिलची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही माहिती वा चित्रीकरण जाणीवपूर्वक बाहेर आणले गेले असल्यास त्याचीही चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
‘तपास केवळ कॉपीच्या मुद्द्यापुरता नको’
साहिलने परीक्षेत कॉपी केली वा मोबाइलचा वापर केला, या मुद्द्यापुरताच तपास मर्यादित राहू नये, अशी भूमिका वाकोडे यांनी मांडली. साहिलविरोधात नेमकी काय कारवाई झाली, त्याच्यावर दबाव टाकला गेला व त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारी स्थिती कशी निर्माण झाली, या सर्व बाबी तपासात येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारकडून अद्याप प्रतिनिधी नाही
आंदोलनाच्या दहा दिवसांत सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने आझाद मैदानात येऊन आपली भेट घेतलेली नाही वा ठोस आश्वासन दिलेले नाही, असे वाकोडे यांनी सांगितले. मात्र, अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या प्रतिनिधीशी आपली भेट झाली असून, त्यांनी सहकार्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या काही दिवसांत विविध नेते आझाद मैदानात येऊन भेटत असून, आपल्या मागण्यांना पाठिंबा देत असल्याचे वाकोडे यांनी सांगितले. आमच्यासारखीच त्यांचीही मागणी आहे. ते आमच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
