मुंबई : साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांकडून जोरदार आंदोलने करण्यात येत असताना गुरुवारी सायंकाळी साहिलच्या पालकांनी थेट आझाद मैदानातच बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. आयआयटी मुंबईच्या परिसरामध्ये आंदोनलाच्या तयारीत असलेल्या साहिलच्या पालकांना पोलिसांनी भांडुप पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले होते. त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेण्यासाठी त्यांना परस्पर सह्याद्री अतिथीगृहावर नेण्यात आले. तेथे सुमारे तासभर चर्चा झाल्यानंतर त्यांनी आझाद मैदानात बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
साहिलचे पालक बुधवारीच आयआयटी मुंबईत येणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांची रवानगी गावाला केल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. त्यानंतर ते गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास आयआयटी मुंबईत येणार असल्याची माहिती देण्यात आली. मात्र त्यांना भांडुप पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले. सुमारे दीड तास त्यांना तेथे थांबवून ठेवल्यानंतर त्यांना अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षांसह समितीला भेटण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर नेण्याचा निर्णय घेतला गेला. पोलिसांच्या ताफ्यासह पालक सायंकाळी चारच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले. तेथे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना आणि समिती सदस्यांसमोर त्यांनी आपली बाजू मांडली. त्यावेळी पालकांनी सीसीटीव्ही चित्रिकरण प्रसारित करणाऱ्यांच्या अटकेचीही मागणी केली. त्याशिवाय प्रा. सूर्यनारायण डुल्ला आणि संचालक प्रा. शिरीष केदारे यांना तातडीने अटक झाली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी आयोगासमोर मांडल्याचे पालकांना कायदेशीर बाबींमध्ये साह्य करणाऱ्या अॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितले.
आयोगाशी झालेल्या भेटीनंतर साहिलच्या पालकांनी आझाद मैदानात उपोषण करण्याबाबत पोलिसांकडे परवानगी मागितली. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर ते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आझाद मैदानात पोहोचले आणि त्यांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचेही साहिलचे वडील रवींद्र वाकोडे यांनी स्पष्ट केले.
गुन्हे शाखेच्या कामाबाबत समाधानी
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यांना गुन्हे शाखेच्या कामाबद्दल समाधानी असल्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी समाधानी असल्याचे उत्तर दिले. तरीही अध्यक्षांनी समिती सदस्यांना या बाबतीत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग तपास करू शकते का, अशी विचारणार केली. आयआयटी मुंबई ही केंद्रीय संस्था असल्याने असा तपास होऊ शकत असल्याचे सदस्यांनी सांगितले आहे, असे अॅड. इंगळे यांनी नमूद केले.
