मुंबई : अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील प्राध्यापकांची संख्या वाढविण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवूनही आयआयटी मुंबईतील एससी, एसटी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील प्राध्यापकांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे माहितीच्या अधिकारातून (आरटीआय) उघडकीस आले आहे. सप्टेंबरमधील आकडेवारीनुसार संस्थेतील ४१२ प्राध्यापकांमध्ये केवळ पाच एससी आणि सहा ओबीसी प्राध्यापक आहेत. एसटी प्रवर्गातील एकही प्राध्यापक नसल्याची माहिती आरटीआयमधून मिळाली आहे.

सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदांवर संस्थेत एकूण ३६३ प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यापैकी २९ जण एससी, आठ जण एसटी आणि ३५ जण ओबीसी प्रवर्गातील आहेत. आयआयटी मुंबईमध्ये मंजूर अध्यापन पदांची संख्या १ हजार २२५ असून त्यापैकी ४५० पदे रिक्त असल्याचेही आरटीआयच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.

ऑल इंडिया ओबीसी स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष किरण कुमार गौड यांनी ही माहिती आरटीआयअंतर्गत मिळवली आहे. यापूर्वी त्यांनी दाखल केलेल्या आरटीआयला फेब्रुवारीमध्ये मिळालेल्या उत्तरानुसार, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या तिन्ही स्तरांवर आयआयटी मुंबईमध्ये एससी प्रवर्गातील ३३ प्राध्यापक होते. एसटी प्रवर्गातील एका सहयोगी प्राध्यापकासह सात सहायक प्राध्यापक होते, तर ओबीसी प्रवर्गातील ४१ प्राध्यापक कार्यरत होते. सप्टेंबरमधील आकडेवारीनुसार एससी प्रवर्गातील प्राध्यापकांची संख्या फेब्रुवारीच्या तुलनेत केवळ एकाने वाढली आहे. या आकडेवारीवरून भारतातील प्रतिष्ठित संस्थांमधील प्राध्यापक भरती आणि प्रतिनिधित्वातील जातीय भेदभावाचा प्रश्न अधोरेखित होत आहे. एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व अत्यल्प किंवा नसल्यास या प्रवर्गातील विद्यार्थी आणि संशोधकांच्या समस्या सोडविण्यात अडचणी येण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहे.

२०२३ मध्ये आयआयटी मुंबईतील प्रथम वर्षाचा विद्यार्थी दर्शन सोलंकी याच्या आत्महत्येनंतर आयआयटींमधील एससी, एसटी आणि ओबीसी प्राध्यापकांच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न शिक्षण क्षेत्रात चर्चेत आला होता. त्यानंतर केंद्र सरकारने एससी आणि एसटी प्रवर्गातील प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी सर्व आयआयटींना विशेष भरती मोहीम राबविण्यास सांगितले होते. यावेळी एससी प्रवर्गातील सुमारे ५२३ उमेदवारांनी प्राध्यापक भरतीसाठी अर्ज केला होता. त्यापैकी केवळ चार जणांची निवड झाली होती. तर एसटी किंवा ओबीसी प्रवर्गातील एकाही उमेदवाराची निवड झाली नव्हती. २०२४ मध्ये एससी प्रवर्गातील ४४ अर्जदारांपैकी दोन जणांची निवड झाली. एसटी प्रवर्गातील २२ अर्जदारांपैकी एका उमेदवाराची, तर ओबीसी प्रवर्गातील १०६ अर्जदारांपैकी तीन उमेदवारांची निवड झाल्याचे आरटीआयच्या माहितीत नमूद करण्यात आले होते.