मुंबई : आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूच्या निष्पक्ष आणि सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी त्याच्या पालकांनी शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. परीक्षेतील गैरप्रकाराच्या आरोपावरून प्राध्यापकांनी आपल्या मुलाचा अपमान केला आणि त्याला धमकावल्याचा आरोपही साहिलच्या वकिलांनी याचिकेद्वारे केला आहे.
रवींद्र आणि सोनाली वाकोडे यांनी याचिकेद्वारे साहिलच्या मृत्यूची सीबीआय किंवा विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक किंवा अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वाखाली ही एसआयटी स्थापन करण्याचेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांच्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची योग्य प्रकारे चौकशी केलेली नाही, असा आरोपही वाकोडे दाम्पत्याने याचिकेत केला आहे.
वकील हितेंद्र गांधी यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेनुसार, १८ सप्टेंबर रोजी साहिल परीक्षेला बसला असताना, त्याच्याकडे मोबाईल सापडल्याचा आरोप करून त्याला दुपारी १२:३८ च्या सुमारास परीक्षा हॉलमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर, त्याला विभागप्रमुखांच्या कार्यालयात नेऊन सुमारे तासभर त्याची चौकशी करण्यात आली. पालकांच्या याचिकेनुसार, आयआयटी मुंबईच्या २०१५ च्या नियमांनुसार, शैक्षणिक गैरप्रकाराचा संशय असल्यास विद्यार्थ्याला पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळायला हवी होती किंवा त्याला नवीन उत्तरपत्रिका द्यायला हवी होती, परंतु तसे काहीही करण्यात आले नाही. उलट, त्याला निलंबन किंवा हकालपट्टीची धमकी देऊन माफीनामा लिहिण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोपही वाकोडे दाम्पत्याने याचिकेद्वारे केला आहे.
पर्यवेक्षकाला चौकशी करण्याचा किंवा शिक्षा देण्याचा अधिकार नव्हता. अशा प्रकरणांत विद्यार्थ्याला आपली बाजू मांडण्याची संधी देऊन, हे प्रकरण योग्य शिस्तपालन समितीकडे सोपवायला हवे होते. मात्र, १३ सप्टेंबर रोजी साहिलशी आपली भेट झाली. त्यावेळी, संबंधित प्राध्यापकाने जातीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे आणि खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचे साहिलने आपल्याला सांगितले होते, असा दावा वाकोडे दाम्पत्याने याचिकेत केला आहे. त्यानंतर, १८ सप्टेंबरच्या घटनेनंतर साहिल आपल्या वसतिगृहातील खोलीवर परतला आणि त्याच सायंकाळी त्याने आत्महत्या केली. परीक्षेदरम्यान घडलेल्या या घटनेनंतर त्याला आधार देण्यासाठी कोणत्याही समुपदेशकाला किंवा मार्गदर्शकाला
बोलावण्यात आले नव्हते. पवई पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर रोजी भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत (ॲट्रोसिटी) गुन्हा दाखल नोंदवण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला, असेही याचिकेत म्हटले आहे.
याचिकेतील मागण्या
घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज, माफीनामा, उत्तरपत्रिका आणि इलेक्ट्रॉनिक नोंदी जतन करून ठेवण्याची मागणी केली आहे. यासोबतच, प्रकरणातील साक्षीदारांना संरक्षण मिळावे आणि तपासावर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत देखरेख ठेवली जावी, अशी मागणी वाकोडे दाम्पत्याने याचिकेद्वारे केली आहे.
