मुंबईतील आयआयटी बॉम्बेच्या कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याने स्वत:चं जीवन संपवल्याची घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. साहिल वाकोडे असं या विद्यार्थ्याचं नाव असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी सलग तीन दिवस कॅम्पसमध्ये धरणे आंदोलन सुरू करत विविध मागण्या केल्या होत्या. त्यानंतर अखेर विद्यार्थ्यांच्या मागण्या आयआयटी बॉम्बे प्रशासनाने मान्य केल्या.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आता प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना निलंबित करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. मात्र, दुसरीकडे आयआयटी मुंबईतील प्राध्यापकांनी प्रा.सूर्यनारायण दुल्ला यांना पाठिंबा दर्शवत त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू केलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
वृत्तानुसार, १८ सप्टेंबर रोजी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर चौकशीच्या पार्श्वभूमीवर आयआयटी बॉम्बे फॅकल्टी फोरमने प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. या प्राध्यापकांना संस्थेतून निलंबित करण्यात आलेलं नाही आणि ते अजूनही प्राध्यापक मंडळाचे सदस्य असल्याचा दावा फॅकल्टी फोरमने केला असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
फॅकल्टी फोरमने काय म्हटलं?
२१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जारी केलेल्या निवेदनात फॅकल्टी फोरमने म्हटलं की, प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना केवळ प्रशासकीय कामकाज या पदावरील जबाबदाऱ्यांतून तात्पुरतं मुक्त करण्यात आलं आहे. या घटनेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. प्राध्यापकांची भूमिका आणि विद्यार्थ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीबाबत प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांच्या अनुषंगाने हे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.
फॅकल्टी फोरमने सूर्यनारायण दुल्ला यांचं वर्णन एक प्रतिष्ठित प्राध्यापक असं केलं. ज्यांना अनेक शैक्षणिक सन्मान मिळालेले आहेत. मात्र, तपासाद्वारे वस्तुस्थिती स्पष्ट होण्याआधी असत्य आणि दिशाभूल करणाऱ्या वृत्तांमुळे दुल्ला यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याने प्राध्यापक वर्गाने चिंता व्यक्त केली आहे.
“एका तरुणांच्या मृत्यूची संवेदना आणि चौकशीची निष्पक्षता ही काही परस्परविरोधी तत्त्वे नाहीत. संस्थेने या दोन्ही गोष्टींचा विचार करूनच आपली पुढील भूमिका ठरवली पाहिजे, असंही फॅकल्टी फोरमने म्हटलं आहे. दरम्यान, ‘फॅकल्टी फोरम’ ही आयआयटी बॉम्बेमधील प्राध्यापकांची एक संघटना आहे. यात जवळपास ७५० प्राध्यापकांचा समावेश असून प्राध्यापकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे.
