मुंबई : साहिल वाकोडे या आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचे आरोप असलेले प्रा सूर्यनारायण डुल्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच आयआयटी मुंबई प्रशासनाने या प्रकरणी दहा सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली असून परीक्षेतील कथित गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेची सखोल चौकशी करून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश समितीला दिले आहेत.

आयआयटी मुंबईच्या संचालक मंडळाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयआयटी पालक्कडच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष प्रा. रमेश व्यंकटेश्वरन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. संस्थेतील विविध विभागांतील प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांना या समितीत स्थान देण्यात आले आहे. प्रकरणाच्या विविध पैलूंची तपासणी करून निश्चित कालावधीत अहवाल सादर करण्याची जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली आहे. समितीत आयआयटी मुंबईच्या मानवविद्या आणि सामाजिक शास्त्र विद्याशाखेतील प्रा. के. नारायणन, यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील प्रा. संदीप कुमार साहा आणि रसायनशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक प्रा. दीप्ती कलसी यांचा समावेश आहे. प्रा. साहा हे संस्थेच्या अनुसूचित जाती-जमाती विद्यार्थी आणि कर्मचारी कक्षाचे संयोजकही आहेत. विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वसतिगृह व्यवहारांचे सरचिटणीस आदित्य जोशी, विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक देव अरोरा आणि संशोधन विद्यार्थी देवी लाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, निवृत्त सनदी अधिकारी विश्वनाथ गिरिराज, भौतिकशास्त्र विभागातील संस्थेचे माजी दक्षता अधिकारी प्रा. के. जी. सुरेश आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांचाही समितीत समावेश आहे.

राजकीय कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर प्रा डुल्ला यांना प्रशासकीय कामकाजाच्या अधिष्ठातापदावरून हटविण्यात आले होते. आता निष्पक्ष चौकशीच्या दृष्टीने त्यांना रजेवर पाठविण्यात आले आहे.

जातिवाचक टिप्पणीच्या आरोपांचीही चौकशी

साहिलच्या पालकांनी केलेल्या आरोपांचाही चौकशी समितीच्या तपासात समावेश करण्यात येणार आहे. साहिलला जातिवाचक टिप्पणी ऐकाव्या लागल्याचा दावा त्याच्या पालकांनी केला आहे. या आरोपांसह प्रकरणातील विविध पैलूंची तपासणी करून समिती आपला अहवाल संस्थेकडे सादर करणार आहे.

मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा

चौकशी समितीच्या सदस्यांची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला देण्यात आली असून, मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याचे संस्थेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे समितीच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत मंत्रालयाची मंजुरी हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रद्द झालेल्या परीक्षा शनिवारी-रविवारी

साहिलच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर १९ आणि २० सप्टेंबर रोजी पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा आता शनिवार आणि रविवारी घेण्यात येणार असल्याचे आयआयटी मुंबईने जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे

अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास उपोषण – रविंद्र वाकोडे साहिलच्या पालकांनी त्याच्यावर जातीय स्वरूपाच्या शेरेबाजीचा आरोप केला आहे. साहिलने आपल्याला जातीय अपमानासंदर्भात सांगितल्याचा दावा त्याच्या पालकांनी केला आहे. या प्रकरणी एफआयआरमध्ये आयआयटी बॉम्बेचे संचालक शिरीष केदारे आणि प्राध्यापक डुल्ला यांची नावे असल्याचे सांगण्यात आले आहे. दोघांच्या अटकेची मागणी साहिलच्या पालकांनी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आपण उपोषण सुरू करू, असा इशाराही साहिलचे वडील रविंद्र वाकोडे यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांचे वर्ग नेहमीप्रमाणे सुरू

संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ मोजके विद्यार्थी आंदोलनाला बसले असताना बाहेर मात्र विविध राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. युवक काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने जातीय शेरेबाजीचा मुद्दा उपस्थित करत आंदोलन सुरू ठेवले. दुसरीकडे, कॅम्पसमध्ये ३०० हून अधिक प्राध्यापक आणि हजारो विद्यार्थ्यांचे वर्ग नेहमीप्रमाणे सुरू होते. त्यामुळे प्रवेशद्वाराबाहेर आंदोलनाचा जोर कायम असला, तरी परिसरातील शैक्षणिक कामकाज पूर्वपदावर येत असल्याचे चित्र होते.