मुंबई : आधुनिक औषधवैद्यकशास्त्रातील प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) ही संसर्गजन्य रोगांवर प्रभावी उपचार देणारी क्रांतिकारी औषधे मानली जातात. अनेक जीवघेण्या संसर्गांवर नियंत्रण मिळवून दरवर्षी लाखो जीव वाचवण्यात या औषधांचा मोठा वाटा आहे. मात्र, काही प्रतिजैविकांमुळे यकृतावर दुष्परिणाम होत असल्याचे एका नव्या संशोधनातून उघडकीस आले आहे. त्यामुळे प्रतिजैविकांचा वापर ही वैद्यकीय क्षेत्रासाठी चिंतेचा विषय ठरणार आहे.

भारतीय तंत्रज्ञान संस्था- मुंबई (आयआयटी मुंबई) येथील जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागाचे प्रा. आकाश कुमार झा, प्रा. आशुतोष कुमार, राज गुप्ता, अरबिंद शाह आणि मलेशियातील सनवे विद्यापीठातील प्रा. वेट्रीसेल्वन सुब्रमण्यम यांनी हे संशोधन केले. प्रा. आकाश कुमार झा आणि प्रा. वेट्रीसेल्वन सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संशोधनात प्रतिजैविकांचा यकृताच्या पेशींशी होणाऱ्या परस्पर क्रियांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून औषधांच्या परिणामांचा संबंध केवळ त्यांच्या तीव्रतेशी नसून पेशींच्या बाहेरील आवरणाशी म्हणजेच पेशी पटलाशी त्या कशा प्रकारे संपर्कात येतात यावरही अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले.

या संशोधनात संशोधकांनी दोन प्रभावी प्रतिजैविकांचा अभ्यास केला. यामध्ये टेइकोप्लेनिन आणि ओरिटावॅन्सिन या दोन प्रतिजैविकांचा यकृतावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. ही दोन्ही औषधे रुग्णालयामध्ये संसर्ग झालेल्या न्यूमोनिया आणि जीवरक्षक प्रणालीशी संबंधित न्यूमोनिया अशा गंभीर जीवाणू संसर्गावर वापरली जातात. रासायनिकदृष्ट्या जवळपास सारखी असतानाही वैद्यकीय वापरात टेइकोप्लेनिनमुळे यकृताशी संबंधित समस्या अधिक आढळतात, तर ओरिटावॅन्सिन तुलनेने सुरक्षित मानले जाते.

Award Banner

संशोधकांनी यकृताच्या पेशींच्या पटलासारखी कृत्रिम रचना तयार करून या औषधांचा परिणाम तपासला. त्यासाठी डायनॅमिक लाइट स्कॅटरिंग (डीएलएस) आणि क्रायो-ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी यांसारख्या प्रगत जैवभौतिक तंत्रांचा वापर करण्यात आला. प्रयोगांमध्ये ओरिटावॅन्सिन पटलांच्या आत खोलवर प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आले. तर टेइकोप्लेनिन पटलाच्या बाह्य पृष्ठभागावर जास्त काळ चिकटून राहते. यामुळे पेशी पटलाच्या विद्युत आणि संरचनात्मक गुणधर्मांमध्ये बदल होऊन दीर्घकाळ ताण निर्माण होतो आणि त्यामुळे यकृताला अधिक हानी होण्याची शक्यता वाढत असल्याचे संशाेधनामध्ये दिसून आले.

या निष्कर्षांची खात्री करण्यासाठी उंदरांवर प्रयोग करण्यात आले. टेइकोप्लेनिन दिलेल्या उंदरांच्या यकृतातील विकरांचे प्रमाण वाढणे, सूज आणि ऊतकांचे नुकसान अशी लक्षणे दिसून आली. याउलट ओरिटावॅन्सिन दिलेल्या उंदरांमध्ये हे परिणाम तुलनेने सौम्य असल्याचे आढळून आले. या संशोधनाला आरआयएफसी, आरआरसीसी आणि आयआयटी मुंबई यांच्याकडून निधी मिळाला आहे.

औषधाच्या रेणूमुळे पेशी पटल (पेशीच्या बाहेरील संरक्षणात्मक आवरण) किती फाटते यावर ते औषध पेशीसाठी किती हानिकारक आहे ते ठरते अशी पारंपरिक समजूत होती. आमच्या अभ्यासाच्या निष्कर्षांमुळे हा दृष्टिकोन कदाचित बदलू शकेल, असे आयआयटी मुंबईतील जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागाचे प्रा. आशुतोष कुमार यांनी सांगितले.

पेशी पटलावर लक्ष केंद्रित करणारी ही पद्धत वापरल्यास. काही उपचारांमुळे अनपेक्षित दुष्परिणाम का होतात हे आपण शोधू शकतो. त्या माहितीच्या आधारे निरोगी पेशींना होणारी हानी कमी करणारी सौम्य औषधी संयुगे तयार करता येऊ शकतात. या चाचण्या तुलनेने जलद आणि मोठ्या प्रमाणावर करता येण्यासारख्या असल्यामुळे औषधनिर्मितीमधील नियमित सुरक्षितता तपासण्यांमध्ये त्यांचा समावेश करता येईल. त्यामुळे संशोधकांना महागात पडणारे विफल प्रयोग टाळण्यास मदत होईल आणि अधिक सुरक्षित औषधे विकसित करण्याकडे वेगाने वाटचाल करता येईल, असे या शोधनिबंधाचे प्रमुख लेखक आकाश कुमार झा यांनी सांगितले.