मुंबई : भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईतील एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहातील गच्चीवरून मंगळवारी रात्री १ वाजता उडी मारून आत्महत्या केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण पसरलेले आहे.
आयआयटी मुंबईमध्ये बीटेक स्थापत्य अभियांत्रिकीच्या (सिव्हिल इंजिनीअरिंग) दुसऱ्या वर्षामध्ये शिकत असलेला नमन अग्रवाल या विद्यार्थाने मंगळवारी रात्री १ च्या सुमारास वसतिगृहाच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. नमन अग्रवाल हा विद्यार्थी आयआयटी मुंबईतील वसतिगृह क्रमांक ४ मध्ये राहाच होता. मात्र त्याने शेजारी असलेल्या वसतिगृह क्रमांक ३ च्या गच्चीवर जाऊन उडी मारली. नमन हा मूळचा राजस्थानमधील पिलानीचा रहिवासी होता. या प्रकरणी पवई पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत. नमनच्या वसतिगृहाच्या खोलीत किंवा घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसली, तरी हे प्रकरण आत्महत्येशी संबंधित असल्याने याचा तपास सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. नमनला कोणतेही व्यसन नव्हते, तसेच त्याला अभ्यासाचा ताणही आला नव्हता, असे त्याच्या मित्रांनी चौकशीत पोलिसांना सांगितल्याचे समजते.
दरम्यान, नमन अभ्यासात हुशार होता. त्याने प्रथम वर्षाला ७० टक्के गुण मिळवले होते. मात्र मागील काही दिवसांपासून तो आयआयटी मुंबईतील मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन उपचार घेत असल्याचे आयआयटी मुंबईच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.

