मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने मुंबईत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला वेग दिला असून दर्जेदार कामांसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) येथे ‘सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे मूल्यांकन’ या विषयावर नुकतीच विचारमंथन कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत महानगरपालिकेच्या ३०० हून अधिक अभियंत्यांनी सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे नियोजन, अंमलबजावणी व गुणवत्ता नियंत्रणाबाबत तंत्रशुद्ध व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले.

मुंबईत ऑक्टोबर २०२३ मध्ये सिमेंट कॉंक्रिटीकरणाचा प्रकल्प सुरू झाला. आतापर्यंत शहरात सुमारे ६० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. मुंबईतील प्रचंड लोकसंख्या घनता आणि दाट नागरी बांधकाम संरचनेमुळे आव्हानात्मक ठरत असलेल्या हा प्रकल्प नियोजनबद्ध पद्धतीने अंमलात आणला जात आहे. रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे सर्वोत्तम दर्जाची व्हावीत, यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून रस्ते बांधणीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, रस्ते बांधणी करताना काय करावे, काय करू नये तसेच प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर काम करणाऱ्या अनुभवी अभियंत्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले.

गुणवत्ता निरीक्षण संस्थेचे प्रतिनिधी, कंत्राटदार संस्था यांची देखील या कार्यशाळेत उपस्थिती होती. यावेळी चर्चासत्रात स्थळ भेटी व तांत्रिक परीक्षणांवर आधारित निरीक्षणांवर चर्चा करण्यात आली. उत्कृष्ट बांधकाम पद्धती अधोरेखित करण्यात आल्या. तसेच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्यवहार्य उपाय सुचविण्यात आले. गुणवत्ता नियंत्रण व गुणवत्ता हमी, भागधारकांमधील समन्वय आणि सिमेंट रस्त्यांच्या टिकाऊपणावर विशेष भर देण्यात आला.

कॉंक्रिट मिश्रण बनविताना गुणवत्तापूर्ण घटक साहित्याचा वापर, रेडीमिक्स कॉंक्रिट प्रकल्प ते प्रत्यक्ष कार्यस्थळापर्यंत कॉंक्रिट मिश्रण वहन करण्याची आदर्श कार्य पद्धती, कॉंक्रिट टाकताना घ्यावयाची काळजी, कॉंक्रिट टाकल्यानंतर ठराविक कालमर्यादेनंतर जॉईंट कटिंग करणे, सुयोग्य पद्धतीने क्युरिंग पूर्ण करणे, काम पूर्ण झाल्यावर थर्मोप्लास्ट, कॅट आईज् दिशादर्शक फलक बसविणे याबाबत प्रा. के. व्ही. कृष्णा राव व प्रा. सोलोमन देब्बार्मा यांनी अभियंत्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. झाडांच्या बुंद्याभोवती संरक्षक जाळीचा वापर केल्यास पादचाऱ्यांना पदपथावर चालण्याकामी अतिरिक्त जागा उपलब्ध होऊ शकते, असे मत आयआयटी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कॉंक्रिट रस्त्यांची अंमलबजावणी सुरु असताना अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, अशा सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधितांना केल्या.