मुंबई : आयआयटी मुंबई प्रशासनाने कॉपी केल्याप्रकरणी साहिल वाकोडेकडून माफीनामा लिहून घेतल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र आयआयटी मुंबईच्या परीक्षेतील गैरप्रकार हाताळण्यासंदर्भातील अधिकृत नियमावलीत विद्यार्थ्याकडून माफीनामा लिहून घेण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. अशा प्रकरणांची चौकशी करून पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढण्यासाठी विभागीय शैक्षणिक शिस्तभंग कृती समिती स्थापन करण्याची प्रक्रिया नमूद आहे. त्यामुळे साहिलच्या प्रकरणात संस्थेच्या निर्धारित प्रक्रियेचे पालन झाले होते का, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.साहिलला दुपारी सुमारे १२.३८ वाजता पर्यवेक्षक प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांनी परीक्षा कक्षामधून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नेण्यात आले.

तेथे त्याने परीक्षेत कॉपी केल्याबद्दल लेखी माफीनामा दिल्याचे आयआयटीतील विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. सीसीटीव्ही चित्रणानुसार, दुपारी सुमारे १.२५ वाजता तो वसतिगृहातील खोलीत परतला. त्यानंतर तो खोलीबाहेर आला नाही. साहिलच्या मृत्यूनंतर संस्थेच्या परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियमावलीनुसार त्याला नवीन उत्तरपुस्तिका का देण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याला परीक्षा कक्षातून बाहेर नेण्याऐवजी नियमांनुसार परीक्षा सुरू ठेवण्याची संधी का देण्यात आली नाही, याचे उत्तरही विद्यार्थ्यांनी मागितले आहे.पोलिसांकडून संबंधित कागदपत्रांची मागणी साहिलच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) संस्थेकडे या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे मागितली आहेत. तपासात प्राध्यापकांच्या कृतीमुळे साहिलने आत्महत्येसारखे पाऊल उचलले का आणि त्याला जातीय भेदभावाचा सामना करावा लागला का, या बाबी तपासल्या जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. प्रक्रियेतील त्रुटींचाही तपास केला जाणार असला, तरी अशा त्रुटींची दखल सामान्यतः संस्थेच्या स्तरावर घेतली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मध्यसत्राच्या उर्वरित परीक्षा एसओपीनंतरचआयआयटी मुंबईच्या केंद्रीय प्रशासनाकडून नियमांच्या अंमलबजावणीवर काटेकोर देखरेख होत नसल्याने अशा प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या विभागांत वेगवेगळी प्रक्रिया अवलंबली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे. त्यामुळे परीक्षेतील गैरप्रकार हाताळण्यासाठी संपूर्ण संस्थेत एकसमान प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. साहिलच्या मृत्यूनंतर मध्यसत्राच्या उर्वरित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, एसओपी तयार झाल्यानंतर त्या घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नियम काय सांगतो?

आयआयटी मुंबईच्या एप्रिल २०१५ मधील नियमावलीनुसार, परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांकडून शिस्तभंग किंवा गैरप्रकार झाल्याचे आढळल्यास पर्यवेक्षकाने संबंधित चिठ्ठ्या, मोबाइल फोन, उत्तरपत्रिका किंवा अन्य साहित्य जप्त करावे. त्यानंतर विद्यार्थ्याला नवीन उत्तरपुस्तिका देऊन परीक्षा पुन्हा देण्याची परवानगी द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेची सविस्तर नोंद करून ती माहिती संबंधित अभ्यासक्रमाच्या विभागप्रमुखांकडे सादर करणे आवश्यक आहे. विभागप्रमुखांनी हे प्रकरण विभागीय शैक्षणिक शिस्तभंग कृती समितीकडे (डी-एडीएसी) पाठवायचे असते. ही समिती उपलब्ध पुराव्यांची छाननी करून गैरप्रकार झाला आहे का आणि तो कोणत्या स्वरूपाचा आहे, हे निश्चित करते. पुरावे स्पष्ट नसल्यास त्याचा लाभ विद्यार्थ्याला देण्यात यावा, असेही नियमावलीत नमूद आहे. समितीचा अंतिम अहवाल मान्यतेसाठी अधिष्ठात्यांकडे पाठविला जातो.