मुंबई : ‘आयआयटी मुंबई’च्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी सायंकाळी आत्महत्या केली. या घटनेनंतर आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत याप्रकरणी प्रशासनाला धारेवर धरले.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान दुसऱ्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेमध्ये पाहताना पकडण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थ्याला परीक्षा कक्षातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. या प्रकरणी त्याच्यावर निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, अशी समजही त्याला देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर हा विद्यार्थी वसतिगृहातील खोलीत परतला. मात्र सायंकाळी तो खोलीमध्ये मृतावस्थेत आढळून आला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाकडून घटनेबाबत उत्तरे देण्याची आणि न्यायाची मागणी केली. संस्थेच्या संचालकांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. यंदाच्या वर्षात ‘आयआयटी मुंबई’मध्ये विद्यार्थ्याच्या मृत्यूची ही तिसरी घटना असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी यावेळी केला.
कारवाईबाबतचे आरोप संस्थेने फेटाळले
दरम्यान, या घटनेबाबत ‘आयआयटी मुंबई’ने जारी केलेल्या निवेदनामध्ये वेगळीच माहिती उघडकीस आली आहे. संस्थेने दिलेल्या निवेदनानुसार संबंधित विद्यार्थी परीक्षेदरम्यान मोबाइलचा वापर करताना आढळला होता. त्याने प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड केली होती. मात्र या विद्यार्थ्याविरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नाही. तसेच, संबंधित शिक्षक आणि विभागप्रमुखांनी त्या विद्यार्थ्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांनी त्याचे समुपदेशन केले आणि या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, अशी ग्वाही दिली. विद्यार्थ्याच्या निधनामुळे आयआयटी मुंबईला अत्यंत दुःख झाले आहे. या दुर्दैवी घटनेचा फटका बसलेले विद्यार्थी, त्यांचे मित्र, वर्गमित्र, प्राध्यापक आणि इतर संबंधित व्यक्तींना संस्था आवश्यक ते सहकार्य करत आहे. संबंधित प्राधिकरणांकडून या मृत्यूच्या परिस्थितीची चौकशी केली जात असल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे.
