मुंबई : देशभरातील आयआयटीमध्ये बुधवारपासून नोकरीसाठीच्या मुलाखतींचे पर्व (कॅम्पस प्लेसमेंट) सुरू झाले असून पहिल्याच दिवशी कोटय़वधी रुपयांच्या वेतनाचे प्रस्ताव विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. देश-विदेशातील नामांकित संस्था विद्यार्थ्यांना नोकरी देण्यास उत्सुक आहेत. यंदा विद्यार्थ्यांना मुलाखतपूर्व प्रस्ताव मिळण्याचे प्रमाणही काहीसे वाढले आहे. गेली दोन वर्षे करोनाच्या प्रादुर्भावामुळे नोकरीच्या संधी रोडावल्याचे चित्र पालटताना दिसत आहे. विशेषत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या नव्या नियुक्त्यांसाठी सरसावल्या आहेत.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीच्या कॅम्पस मुलाखतींच्या पर्वावर काहीसा परिणाम झाला होता. अनेक विद्यार्थ्यांना नोकरीचे प्रस्ताव मिळाले, मात्र प्रत्यक्षात अनेकांना नोकरी मिळाली नाही. परदेशातील नोकरीचे प्रस्तावही अनेक कंपन्यांनी मागे घेतले. यंदाचे मुलाखतींचे डिसेंबरचे सत्र चित्र पालटू लागल्याचे दाखवणारे आहे. पहिल्याच दिवशी कोटय़वधी रुपयांचे वेतनाचे प्रस्ताव विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. आयआयटी मुंबईमध्ये पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात २८ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. आयआयटी मद्रासच्या १७६ विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी नोकरीचा प्रस्ताव मिळाला आहे. आयआयटी गुवाहटीच्या २०० तर आयआयटी रुडकीच्या २१८ विद्यार्थ्यांची पहिल्या दिवशी निवड झाली.

मुलाखतपूर्व प्रस्तावांमध्ये वाढ

यंदा मुलाखतीच्या सत्रापूर्वीच गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना हेरून नोकरीचे प्रस्ताव देणाऱ्या कंपन्यांमध्ये वाढ झाली आहे. आयआयटी मुंबईतील २०१, आयआयटी मद्रास येथील २३१, आयआयटी रुडकी येथील २१९, आयआयटी मंडी येथील १३७ विद्यार्थ्यांना मुलाखतपूर्व प्रस्ताव मिळाले आहेत. आयआयटी गुवाहटी येथे गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक म्हणजे १७८ विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या सत्रापूर्वीच नोकरीचे प्रस्ताव मिळाले.

पहिल्याच दिवशी कोटय़वधींचे प्रस्ताव

मुलाखत पर्वाच्या पहिल्याच दिवशी देशातील आणि विदेशातील नोकरीसाठी कंपन्यांनी कोटय़वधी रुपयांचे वेतन देऊ केले आहे. आयआयटी मुंबईतील एका विद्यार्थ्यांला वार्षिक २.७४ लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे २ कोटी रुपयांपेक्षा अधिक वेतनाचा प्रस्ताव उबरने दिला आहे. आयआयटी रुरकीतील ११ विद्यार्थ्यांना वार्षिक १ कोटीपेक्षा अधिक वेतनाचा प्रस्ताव मिळाला आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या अधिक

गुगल, क्वालकॉम, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, रुब्रिक यांसह माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी आघाडी घेतली आहे. त्याशिवाय अ‍ॅमेझॉन, उबर, बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुप, जे पी मॉर्गन या कंपन्या विद्यार्थ्यांना नोकरी देण्यास उत्सुक आहेत.