‘टेकफेस्ट’मध्ये भारत, ब्राझिल, रशिया, चीन, बांगलादेशचे रोबो एकमेकांशी भिडणार

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वानाच रोबोचे नवल. आपण सांगितलेले काम आज्ञाधारकपणे करणारा हा यंत्रमानव काय काय करू शकतो याची झलक मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) तंत्रज्ञान-विज्ञान महोत्सवाच्या पहायला मिळणार आहे. तसेच हे रोबो साधेसुधे नसून चीन, रशिया, ब्राझिल असे देशोदेशीचे असणार आहेत.

आयआयटीच्या या तंत्र महोत्सवात वेगवेगळ्या स्पर्धांत नाना आकार व प्रकाराचे रोबो सहभागी होणार आहेत. ‘रोबो कॉमबॅट’ ही भारतीयांकरिता नवी संकल्पना आहे. मात्र अनेक देशांत माणसांच्या कुस्तीप्रमाणेच ‘रोबो वॉर’ मोठय़ा आणि व्यावसायिकरित्या केले जाते. ‘रोबो वॉर अरेना’च्या माध्यमातून आम्ही भारतात ही संकल्पना रुजवायचा प्रयत्न करत आहोत,’ असे टेकफेस्टच्या ‘रोबो वॉर अरेना’ स्पर्धेचा आयोजक सचितने सांगितले.

आयआयटीचे अधिष्ठाता प्रा. सौम्या मुखर्जी यांनी सांगितले की, ‘रोबो वॉर अरेनाचे हे नववे वर्ष. खेळाच्या माध्यमातून रोबोची ओळख आधिकाधिक लोकांना व्हावी हे रोबो वॉर अरेनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जिथे मानवाच्या जीवाला धोका आहे किंवा खूप किचकट काम करायला लागणार असेल अशा ठिकाणी रोबोचा वापर जगभर होत आहे.’ रोबोंमुळे श्रमिक बेरोजगार होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावते ते म्हणाले, ‘माणसाच्या मेंदूची काम करण्याची शक्यता अफाट आहे आणि कोणतेही यंत्र मानवी श्रमांना पूर्णत: पुनस्थित करू शकत नाही.”

यंदाच्या रोबो वॉर अरेना स्पर्धेत भारत, चीन, रशिया, ब्राझील आणि बांगलादेश उतरणार आहेत. ही स्पर्धा १४ किलो तसेच ५५ किलो वजनी गटात होणार आहे. मागील वर्षीचा विजेता अक्षय जोशी या वर्षीही भारताचे प्रतिनिधित्त्व करत आहे. ‘रोबो कॉमबॅटद्वारे मोठय़ा प्रमाणात रोबोटिक्सचा प्रचार आणि प्रसार होत आहे. करमणुक क्षेत्रात रोबो कॉमबॅटने मोठी मुसंडी मारली आहे,’ असे अक्षयने सांगितले. रशियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अ‍ॅलेक्झांडरच्या मते रोबोटिक्सद्वारे वेगवेगळी क्षेत्रे एकत्र येऊन काम करीत आहेत. त्यामुळे भविष्यात संगणक, मेकॅनिकल, सिव्हील अशा क्षेत्रांचा सहयोग दिसून येईल. ब्राझील संघाचा प्रमुख डाऊग्लस म्हणाला, ‘ब्राझीलमध्ये रोबो कॉमबॅट अतिशय लोकप्रिय आहे. मानव आणि यंत्र यांच्या कौशल्याची योग्य सांगड घातली जाते.’

रोबो कॉमबॅटमध्ये वापरले जाणरे रोबो हे स्ट्रॉंग या गटात मोडतात मात्र भविष्यात आपल्याला स्मार्ट रोबोंच्या निर्मितीस प्राधान्य द्यायला हवे. रोबो जर स्मार्ट कंप्युटरशी संलग्न असतील तर अनेक उपयोगी कामे करू शकतात, असे मत चीनच्या टॉंगने मांडले. पाच देशातील हा रोबो वॉरचा सामना उद्यापासून आयआयटी मुंबईत रंगणार आहे.