scorecardresearch

‘आयआयटी’ने उद्योजक निर्माण करावेत! केद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांचे आवाहन; नव्या वसतिगृहाचे उद्घाटन

पवई येथील आयआयटी कॅम्पसमधील वसतिगृहाचे धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले.

मुंबई : वेगाने बदलणाऱ्या भौगोलिक व राजकीय परिस्थितीत भारताला वरचे स्थान मिळावे यासाठी आयआयटी मुंबईने प्रमुख भूमिका हाती घ्यावी, एकविसाव्या शतकातील समस्यांचा आढावा घेऊन त्यावर उत्तरे शोधण्याचे काम आयआयटीने करावे, आयआयटीने नुसतेच नोकरदार कर्मचारी घडवू नयेत तर नोकऱ्या देणारे उद्योजक, जगाला दिशा देणारे संशोधक निर्माण करावे, असे आवाहन केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी केले.

पवई येथील आयआयटी कॅम्पसमधील वसतिगृहाचे धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशीष चौधरी आणि प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. पवन गोएंका उपस्थित होते.  अभ्यासासाठी चांगले वातावरण असेल तर विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो. त्यामुळे काहीतरी नवीन शोधण्याची, संशोधन करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रधान  म्हणाले. वेगाने बदलणाऱ्या भू-राजकीय परिस्थितीमुळे आणि साथीच्या आजारांमुळे सर्व जगापुढे वेगवेगळय़ा समस्या उभ्या राहिल्या आहेत. आर्थिक, नैसर्गिक, आरोग्यविषयक अशा अनेक समस्या असून या बदलत्या व्यवस्थेत भारताला पुढे नेण्याची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले. येत्या पंचवीस वर्षांत भारताला कोणत्या गोष्टींची गरज लागू शकते त्याचा वेध घेऊन त्याची निर्मिती करण्याचे आव्हान आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी पेलावे, असेही ते या वेळी म्हणाले.

माजी विद्यार्थ्यांचेही योगदान हवे 

आयआयटीतून  गेल्या ६० वर्षांत ६२ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले. या विद्यार्थ्यांची माहिती संस्थेने गोळा करावी, असे आवाहन त्यांनी केले. सहा माजी विद्यार्थ्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेत ३०० ते ४०० अब्ज डॉलर्सचे योगदान दिले आहे. त्यामुळे बाकीचे विद्यार्थी कुठे आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्या ज्ञानाचा जगाच्या कल्याणासाठी वापर करण्याची गरज असल्याचेही मत व्यक्त केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Iits should create entrepreneurs education minister dharmendra pradhan zws

ताज्या बातम्या