मुंबई : परदेशातील अनेक बेटिंग अॅप कार्यरत असून या माध्यमातून गोळा झालेले सुमारे दोन हजार कोटी रुपये पांढरे करण्यासाठी परदेशात पाठविण्यात आले असून कृत्रिम बौद्धिक संपदेच्या (एआय) नावाखाली ही गुंतवणूक करण्यात आली असल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या एका चौकशीत उघड झाली आहे. त्यामुळे आता संचालनालयाने याबाबत विविध बेटिंग अॅपवर लक्ष केंद्रीत केले आहे. याबाबत संचालनालयाकडून सविस्तर अहवाल रिझर्व्ह बँकेला पाठविला जाणार आहे.

सायप्रस येथील भारतात बंदी असलेला ‘परीमॅच’ या बेटिंग अॅपच्या माध्यमातून गोळा झालेले सुमारे २०० कोटी रुपये परदेशांतील एआयशी संबंधित कंपन्यांतील गुंतवणूक म्हणून पाठविण्यात आल्याचा प्रकार संचालनालयाच्या तपासादरम्यान उघड झाला. त्यावेळी अशा पद्धतीचे अनेक परदेशी बेटिंग अॅप कार्यरत असल्याची माहितीही बाहेर आली आहे. या पद्धतीने दोन हजारहून अधिक कोटींची रक्कम परदेशात गुंतवणुकीच्या नावाखाली पाठविण्यात आली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बेटिंग अॅपद्वारे गोळा झालेली रक्कम सुरुवातीला भारतीय कंपन्यांच्या खात्यात जमा केली जाते. या कंपन्यांची स्थापना ही गुन्ह्याची रक्कम मिळण्यासाठीच केलेली असते. त्यानंतर ही रक्कम परदेशात स्थापन झालेल्या कंपनीत वळती केली जाते. या दोन्ही कंपन्यांमध्ये बोगस संचालक असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले आहे. ही रक्कम मिळाल्यानंतर संबंधित भारतीय तसेच परदेशी कंपन्या तात्काळ आपली खाती बंद करीत असल्याचेही उघड झाले आहे.

ही सर्व रक्कम एआय कंपन्यांत गुंतविल्याचे दाखविले जाते. मात्र प्रत्यक्षात ही रक्कम अधिकृत करण्याचा हा प्रयत्न असून या मार्गातून ही रक्कम अॅपच्या चालकांना मिळते, असे या सूत्रांनी सांगितले. महादेव बेटिंग अॅपच्या चौकशीतही ही बाब उघड झाली होती. या अॅपचा चालक सौरभ चंद्राकार याच्याकडे याच मार्गाने कोट्यवधींची रक्कम पोहोचती केली जात होती. मात्र त्यात प्रामुख्याने हवाला मार्गाचा वापर केला जात होता. हा प्रकार उघड झाल्यामुळे आता अॅप चालकांनी वेगळ्या मार्गाचा अवलंब केला असावा, असा संशय सूत्रांनी व्यक्त केला.

या प्रकरणी पेरीमॅच या बेटिंग अॅपची पद्धत उघड झाली असून दिल्लीतील दोन कंपन्यांमार्फत सिंगापूर येथील कंपन्यांत गुन्ह्यातील रक्कम हस्तांरित झाल्याचा सुगावा संचालनालयाला स्पष्ट करता आला आहे. सप्टेंबर महिन्यात संचालनालयाने महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान आणि गुजरातमधील काही सनदी लेखापाल, कंपनी सचिवांकडे टाकलेल्या छाप्यात याबाबत माहिती मिळाली आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.